कोलंबियावर ४-० अशा विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

बचाव आणि आक्रमण या आघाडय़ांवर सर्वोत्तम कामगिरी करताना जर्मनीने कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील आगेकूच कायम राखली आहे. जर्मनीने कुमार विश्वचषक स्पध्रेतील पहिल्या जेतेपद पटकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत १९८५च्या उपविजेत्या जर्मनीने ४-० अशा फरकाने कोलंबियावर सहज विजय मिळवला. जॅन-फिएट अर्पने दोन गोल केले, त्याला यान बिसेक आणि येबुआह यांनी प्रत्येकी एक गोल करून योग्य साथ दिली.

कोलंबिया व जर्मनी यांनी अनुक्रमे ‘अ’ आणि ‘क’ गटात दुसरे स्थान निश्चित करीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सामन्याबाबत भाकीत करणे कठीण होते. आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडींवर उभय संघ एकमेकांना पूरक होते. मात्र जर्मनीने एकहाती वर्चस्व गाजवले. कोलंबियाकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले, परंतु त्याला अंतिम स्वरूप देण्यात ते अपयशी ठरले. सहाव्यांदा कुमार विश्वचषक स्पध्रेत सहभागी झालेल्या कोलंबियाला उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. २००३ आणि २००९मध्ये कोलंबियाने चौथे स्थान पटकावले होते.

सामन्याच्या पाचव्या मिनिटाला कोलंबियाकडून गोल करण्याचा पहिला प्रयत्न झाला, परंतु चेंडू गोलजाळीच्या वरून गेला. सातव्या मिनिटाला जर्मनीने खाते उघडून जोरदार पलटवार केला. अर्पने कोलंबियाच्या बचावपटूंना चकवत पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला आणि त्याचवेळी गोलरक्षक केव्हिन मिएर चेंडू अडवण्यासाठी पुढे आला. मात्र त्याच्या हातून चेंडू निसटला आणि अर्पने अगदी सहज गोल करीत आघाडी घेतली. त्यानंतर ३९व्या मिनिटाला शाव्हेर्डी सेटिनच्या क्रॉसवर यान बिसेकने अप्रतिम हेडर लगावत चेंडू गोलजाळीत सहज तटवला. जर्मनीने पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी घेत कोलंबियाच्या मनोबलाचे खच्चीकरण केले.

मध्यंतरातही जर्मनीने सातत्यपूर्ण खेळ करताना पहिल्या चार मिनिटातच आणखी एक गोल केला. अर्पने उजव्या बाजूने अगदी सहज पास दिलेला चेंडू येबुआहने कोलंबियाच्या बचावपटूला सहज चकवून गोलजाळीत सुपूर्द केला. जर्मनीने ३-० अशी आघाडी घेत विजय निश्चित केला होता. मात्र कोलंबियाचे खेळाडू हार मानण्यास तयार नव्हते. त्यांनी अखेरच्या काही मिनिटांत चुरस दाखवली, परंतु त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. ६५व्या मिनिटाला अर्पने जर्मनीच्या खात्यात आणखी भर घालत ४-० असा विजय निश्चित केला.