06 August 2020

News Flash

..हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

राठोड यांच्या हस्ते मंगळवारी भारतीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड

कुमार फुटबॉलपटूंना केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या शुभेच्छा

‘भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची स्पर्धा होत आहे. त्यानिमित्ताने भारतही प्रथमच फिफा स्पध्रेत खेळणार आहे आणि तुम्ही या इतिहासाचे शिलेदार आहात. हा तुमच्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरणार आहे आणि प्रत्येक क्षणाची नोंद होणार आहे. विजयाच्या पक्क्या निर्धारानेच तुम्ही मैदानावर उतरा,’ असा प्रेरणादायी संदेश केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना दिला.

राठोड यांच्या हस्ते मंगळवारी भारतीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस कुशल दास उपस्थित होते. राठोड म्हणाले की, ‘कुमार विश्वचषक स्पध्रेतील प्रत्येक सामना हा तुमच्या आयुष्यातील अनमोल ठेवा असेल.. हा क्षण तुम्ही आयुष्यभर जपून ठेवाल आणि त्यामुळे तुम्ही अविस्मरणीय ठेव्यासाठी आणि विजयासाठी खेळा. कुमार विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यानंतरचा प्रत्येक क्षण जो तुम्ही मैदानावर घालवाल तो संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या स्पध्रेसाठी तुम्हाला शुभेच्छा. हार मानू नका आणि जिद्दीने खेळा.’

भारतीय संघ कुमार विश्वचषक स्पध्रेत अभिमानास्पद कामगिरी करेल, असे मत या वेळी दास यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘या स्पध्रेसाठी आम्ही सज्ज आहोत. भारतीय फुटबॉलचा प्रवास आत्ता सुरू झाला आहे आणि अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.’

विश्वचषक स्पध्रेतील भारतीय संघ निवडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अभिषेक यादव म्हणाले की, ‘क्रीडामंत्र्यांच्या वाक्यातून आम्हाला प्रेरणा  मिळाली आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचे मनोबल उंचावले आहे.

चिलीच्या खेळाडूंवर दूरध्वनी बंदी

समाजमाध्यमांवर चाललेल्या घडामोडींचा कामगिरीवर परिणाम होऊ नये, यासाठी चिली संघातील खेळाडूंना प्रत्येक दिवशी केवळ दोन तासच दूरध्वनी वापरण्याचा फतवा काढण्यात आला आहे. ‘‘खेळाडूंना प्रति दिवस केवळ दोन तास दूरध्वनी वापरता येणार आहे. याबाबत प्रशिक्षकांची भूमिका ठाम आहे आणि समाजमाध्यमांवरील घडामोडी

आणि दूरध्वनीवरील गेम्स याने खेळाडूंच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो, याची त्यांना जाण आहे,’’ असे चिली संघाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

चिलीचा पहिला सामना बलाढय़ इंग्लंडविरुद्ध ८ ऑक्टोबरला कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे.

अद्ययावत सुविधांमुळे फुटबॉलचा विकास -सेप्पी

भारतात होणाऱ्या आगामी कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्ताने तयार झालेल्या सुविधा ही मोठी देणगी असून त्यामुळे येथील फुटबॉलचा आणखी विकास होईल, असे स्पध्रेच्या स्थानिक संयोजन समितीचे संचालक झेव्हियर सेप्पी यांनी सांगितले.

भारतात जागतिक दर्जाच्या सुविधांच्या अभावी फुटबॉलची प्रगती खुंटली होती. आगामी विश्वचषक स्पर्धेमुळे अनेक ठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. अनेक प्रायोजक लाभले आहेत. त्यामुळे या खेळाच्या प्रगतीमधील अडथळा दूर झाला आहे. देशातील अकरा कोटी खेळाडू या खेळाकडे वळले आहेत, ही या खेळातील क्रांतीच आहे. या स्पर्धेनिमित्त देशातील ३७ शहरांमधील १५ हजारहून अधिक शाळांनी या खेळासाठी पुढाकार घेतला आहे, असे सेप्पी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2017 2:48 am

Web Title: fifa u17 world cup union sports minister rajyavardhan singh rathore
Next Stories
1 फुटबॉलपटूंच्या पालकांच्या व्यवस्थेचा महासंघाकडून ‘फुटबॉल’
2 Pro Kabaddi Season 5 – घरच्या मैदानावर तामिळ थलायवाजचा पराभव, तेलगूचा आक्रमक खेळ
3 Pro Kabaddi Season 5 – गुजरातकडून दबंग दिल्लीचा धुव्वा
Just Now!
X