23 May 2018

News Flash

फिफा विश्वचषकात यजमान भारत विक्रमाच्या उंबरठ्यावर

तीन गोल आणि प्रेक्षकांच्या गर्दीनं इतिहास घडेल

तीन गोल आणि प्रेक्षक इतिहास घडवतील.

१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यातच भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. मात्र, यंदा यजमानपदाचा मान मिरवणारा भारत सध्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतात रंगलेल्या स्पर्धेतील फुटबॉल सामने पाहणाऱ्या चाहत्यांचा आलेख चीनशी टक्कर देणारा आहे. कुमार विश्वचषकातील सर्वाधिक प्रेक्षकवर्ग आणि गोल या दोन गोष्टीत भारताने अभुतपूर्व यश मिळवलंय.

आतापर्यंत देशातील सहा ठिकाणी खेळवण्यात आलेल्या सामन्यात १२ लाख २४ हजार २७ प्रेक्षकांनी मैदानात उपस्थिती दर्शवली आहे. चीनमध्ये १९८५ मध्ये रंगलेल्या पहिल्या विश्वचषकात १२ लाख ३० हजार ९७६ प्रेक्षकांनी सामना पाहिला होता. या विक्रमाला मोडीत काढण्यासाठी भारतीय फुटबॉल मैदानात आता केवळ ६९४९ प्रेक्षकांनी उपस्थिती लावण्याची आवश्यकता आहे. या स्पर्धेतील दोन सामने बाकी आहेत. यात हा विक्रम भारताच्या नावे होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

याशिवाय १७ वर्षाखालील फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोलचा विक्रमही भारताच्या नावे होऊ शकतो. आतापर्यंत स्पर्धेत खेळवण्यात आलेल्या ५० सामन्यात १७० गोलची नोंद झाली आहे. यापूर्वी २०१३ मध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये रंगलेल्या कुमार विश्वचषकात १७२ विक्रमी गोलची नोंद झाली होती. त्यामुळे आगामी दोन सामन्यातील ३ गोल भारताच्या यजमान पदाचा चेहरा मोहरा बदलण्यास उपयुक्त ठरतील. यजमानपदाची संधी मिळाल्यामुळे देशातील फुटबॉलचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. स्पर्धेला प्रेक्षकांनी दिलेली दाद आणि खेळाडूंची कामगिरी या दोन्ही गोष्टी भारतीय फुटबॉलबद्दल रंगलेली चर्चा खरी असल्याचे संकेत देणारी अशीच आहे.

First Published on October 26, 2017 5:36 pm

Web Title: fifa under 17 world cup record attendance and goal
  1. No Comments.