लेडी अँड्राडे आणि कॅटेलिना उस्मे यांच्या बहारदार खेळाच्या जोरावर कोलंबिया संघाने फिफा महिला विश्वचषक स्पध्रेत ऐतिहासिक झेप घेतली. कोलंबियाने तगडय़ा फ्रान्सचा
२-० असा पराभव करताना विश्वचषकातील पहिल्या विजयाची नोंद केली.
पहिल्या ४५ मिनिटांत फ्रान्सने आक्रमक खेळ केला असला तरी त्यांना गोल करण्यात अपयश आले. दुसरीकडे कोलंबियाने सांघिक आणि शिस्तबद्ध खेळ केला आणि त्याची पोचपावती त्यांना विजयास्वरूपात मिळाली. १९व्या मिनिटाला अँड्राडेने गोल करून कोलंबियाला आघाडीवर ठेवले. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राखत कोलंबियाने सामन्यावर पकड घेतली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला, परंतु कोलंबियाने सामन्याच्या शेवटपर्यंत १-० अशी आघाडी कायम राखली होती. ९०व्या मिनिटाला उस्मेने गोल करून त्यात भर टाकली आणि कोलंबियाला २-० असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ‘‘आम्ही येथे केवळ जागा भरण्यासाठी आलेलो नाही, हे या विजयाने सिद्ध केले,’’ अशी प्रतिक्रिया कोलंबियाचे प्रशिक्षक फॅबिअन टाबोर्डा यांनी दिली.
इतर निकाल
ब्राझील १ (अँड्रेसा अ‍ॅल्वेस) विजयी वि. स्पेन ०; इंग्लंड २ (कॅरेन कार्नेय, फ्रान्सेस्का किर्बी) विजयी वि. मेक्सिको १ (फॅबिओला इबारा);
दक्षिण कोरिया २ (गा इऊल जेऑन, सो यून जी) बरोबरी वि. कोस्टा रिका २ (मेलिस्सा हेरेरा, कार्ला व्हिलालोबोस).