अखेरच्या क्षणापर्यंत हल्ले-प्रतिहल्ले यांनी रंगलेल्या या सामन्यात अमेरिकेने घानावर २-१ असा रोमहर्षक विजय मिळवला. घानाच्या वीरांनी मागील दोन विश्वचषक स्पर्धामध्ये अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्याचा वचपा काढल्यामुळे तमाम अमेरिकेच्या क्रीडारसिकांनी विजयाचा उत्साही आणि उत्सवी जल्लोष साजरा केला.
सामना सुरू होऊन अर्धे मिनिटही झाले नव्हते, तोच क्लिंट डेम्पसेने धक्कादायकरीत्या अमेरिकेचे खाते उघडले, परंतु त्यानंतर मात्र अमेरिकेला हे वर्चस्व राखता आले नाही. अ‍ॅन्ड्रय़ू अयीवने ८२व्या मिनिटाला असामोह ग्यानने दिलेल्या पासवर अप्रतिम गोल साकारत संघाला बरोबरी साधून दिली. ग्यानच्याच पराक्रमामुळे चार वर्षांपूर्वी अमेरिकेपुढे पूर्णविराम दिला गेला होता.
त्यानंतर चारच मिनिटांनी २० वर्षीय जॉन ब्रूक्सने ग्रॅहम झुसीच्या कॉर्नर किकचे हेडरद्वारे गोलमध्ये रूपांतर करण्याची किमया साधली. अमेरिकेच्या ८४ वर्षांच्या आणि ३० सामन्यांच्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या इतिहासात प्रथमच बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या खेळाडूने गोल झळकावला.

सामना संपल्याची शिटी वाजताच अमेरिकेच्या चमूने मैदानावर विजयी आनंद साजरा केला. ‘यूएसए.. यूएसए..’ या सिंहगर्जनांनी अमेरिकन पाठीराख्यांनीही मैदान दणाणून सोडले. अमेरिकेचे प्रशिक्षक जर्गेन क्लिंसमॅन यांनी हा सामना अंतिम सामन्याप्रमाणेच थरारक होता, असे नमूद केले.
अमेरिकेचा कर्णधार डेम्पसेसाठी हा सामना रक्तरंजित ठरला. ३१व्या मिनिटाला जॉन बोयेची किक लागल्यामुळे डेम्पसेच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर तो टिश्यू पेपरने रक्त पुसतच सामना खेळला. दुसऱ्या सत्रात तर त्याला श्वास घेणेसुद्धा कठीण जात होते, परंतु त्याने अखेपर्यंत मैदान सोडले नाही.