बेल्जियमसारखा दुबळा संघ समोर असतानाही अर्जेटिनाचे फासे अपेक्षेप्रमाणे पडले नाहीत. पण गोंझालो हिग्युएनने आठव्या मिनिटालाच केलेल्या एकमेव गोलाच्या बळावर अर्जेटिनाने बेल्जियमचा १-० असा पराभव केला. या विजयासह अर्जेटिनाने तब्बल २४ वर्षांनंतर उपांत्य फेरीत धडक मारण्याचे स्वप्न पूर्ण केले.
प्रतिस्पर्धी संघाचे दोन-तीन खेळाडू लिओनेल मेस्सीला रोखण्याचे चित्र मागील काही सामन्यांत दिसले होते. त्यामुळे प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यासाठी मेस्सीवर सेंटर मिडफिल्डची जबाबदारी सोपवली. त्यामुळे हिग्युएनवर आघाडीवीराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या चार सामन्यांत हिग्युएन अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर बरीच टीका होत होती. पण आठव्या मिनिटाला अँजेल डी मारियाने बेल्जियमच्या गोलक्षेत्रात हल्ला चढवला. त्याने दिलेल्या पासवर चेंडू बेल्जियमच्या बचावपटूच्या पायाला लागून थेट गोंझालो हिग्युएनच्या समोर पडला. हिग्युएनने क्षणाचाही विलंब न लावता डाव्या पायाने मारलेला फटका गोलजाळ्यात गेला. सामन्याच्या सुरुवातीलाच गोल झाल्यामुळे अर्जेटिनाच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
बेल्जियमच्या आघाडीवीरांनी आक्रमक खेळ करत अर्जेटिनाच्या बचावपटूंवर दडपण आणले. पण इझेक्वायल गॅरे याला चेंडूला गोलजाळ्यात धाडण्यात यश आले नाही. ३२व्या मिनिटाला डी मारियाने पुन्हा एकदा गोल करण्याची संधी निर्माण केली. पण या वेळी त्याला बेल्जियमच्या बचावपटूंना भेदता आले नाही. याच प्रयत्नांत त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. दुसऱ्या सत्रानंतर त्याला दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. ३९व्या मिनिटाला मरौने फेलिआनीने गोलक्षेत्राच्या जवळ मेस्सीला पाडल्यामुळे अर्जेटिनाला फ्री-किक मिळाली. पण त्यावर मेस्सीने मारलेला फटका गोलजाळ्याच्या वरून गेला. पहिल्या सत्रात बेल्जियमला बरोबरी साधणारा गोल करता आला नसला तरी त्यांनी चेंडूवर सर्वाधिक वेळ ताबा मिळवला.
या सामन्यात चमकदार कामगिरी करू न शकल्यामुळे बेल्जियमचा अव्वल खेळाडू इडेन हझार्डने त्याच्या राग लुकास बिग्लियावर काढला. या कृत्यामुळे हझार्डला दुसऱ्या सत्रात पिवळे कार्ड दाखवण्यात आले. ५५व्या मिनिटाला हिग्युएनने पुन्हा बेल्जियमच्या गोलक्षेत्रात धडक मारली. पण समोर बेल्जियमचा बचावपटू विन्सेन्ट कोम्पानी आणि गोलरक्षक थिबाऊट कोर्टियस असताना त्याने मारलेला फटका कोम्पानीच्या पायाला लागून गेला. ७५व्या मिनिटाला रोमेलू लुकाकू आणि फेलिआनी यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. पण अर्जेटिनाच्य भक्कम बचावफळीसमोर त्यांचे प्रयत्न फोल ठरले. ९०व्या मिनिटाला मेस्सीने सर्वोत्तम
कामगिरी करणारा गोलरक्षक कोर्टियससमोर आव्हान उभे केले होते. पण कोर्टियसपुढे मेस्सीचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. अखेर ‘डार्क हॉर्स’ समजल्या जाणाऱ्या बेल्जियमचा या विश्वचषकातील प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आला.