क्रिकेट हा धर्म मानल्या गेलेल्या आशियाई देशांमध्ये फुटबॉलसाठी अव्वल दर्जाचे नैपुण्य नाही, याचा प्रत्यय पुन्हा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पाहायला मिळाला. आशिया विभागातून इराण, दक्षिण कोरिया, जपान व आशिया-ओशेनियाचा प्रतिनिधी म्हणून ऑस्ट्रेलिया हे चार संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले. त्यांपैकी एकाही संघाला या स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळविण्यात यश आले नाही. तसेच एकही सामना जिंकता आला नाही.
तसे पाहिल्यास इराण, जपान व कोरिया या देशांमध्ये क्रिकेटचा फारसा बोलबाला नाही. त्यामुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या देशात फुटबॉलचा खेळ झाकोळला गेला असे म्हणणे चुकीचे होईल. ऑस्ट्रेलिया या देशात क्रिकेटची भरपूर लोकप्रियता आहे. मात्र त्यांचे खेळाडू हॉकीसारख्या अन्य सांघिक खेळांतही अव्वल दर्जाचे मानले जातात. त्यामुळेच क्रिकेटच्या अतिरेकामुळे फुटबॉलच्या लोकप्रियतेवर अनिष्ट परिणाम झाला असे मत मांडणे चुकीचे होईल. फुटबॉलमध्ये ज्या काही निराशाजनक कामगिरीला त्यांना सामोरे जावे लागले त्याला खेळाडूंचा खराब व बेभरवशाचा खेळच जबाबदार म्हणावा लागेल.
या चारही संघांच्या या स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेतल्यास या संघांनी पात्रता फेरीचा अडथळा पार करून मुख्य स्पध्रेत कसे स्थान मिळविले, याचेच आश्चर्य वाटले. इराणला ‘फ’ गटात स्थान देण्यात आले होते. या गटात त्यांच्यापुढे नायजेरिया, अर्जेटिना व बोस्निया यांचा समावेश होता. इराणने नायजेरियाला बरोबरीत रोखले, तर अर्जेटिना व बोस्निया यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली. अर्जेटिना व नायजेरिया या दोन्ही संघांविरुद्ध इराणच्या खेळाडूंनी कौतुकास्पद खेळ केला. अर्जेटिना हा माजी विजेता संघ असून संभाव्य विजेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. हे लक्षात घेता इराणच्या खेळाडूंनी त्यांना दिलेली लढत उल्लेखनीय होती.
इराणच्या खेळाडूंची मुख्य मदार ताकदवान खेळावर होती हे आजपर्यंत त्यांनी अनेक वेळा दाखवूनही दिले आहे. मात्र फुटबॉलमध्ये यश मिळवायचे असेल तर बौद्धिक आलेखही उच्च दर्जाचा आवश्यक आहे. त्यामुळेच मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांचे खेळाडू कमी पडले. रेझा घुचानेझाड याचा अपवाद वगळता त्यांचे अन्य खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. आक्रमणाबरोबरच भक्कम बचावफळीही आवश्यक असते. त्यांचे खेळाडू बचावात्मक खेळात कमी पडले. विशेषत: बोस्नियाविरुद्धच्या लढतीत इराणची बचावात्मक फळी कार्यरतच नव्हती असेच वाटत होते. फुटबॉल म्हणजे दांडगाईचा खेळ नाही हे त्यांच्या खेळाडूंनी लक्षात ठेवले पाहिजे. बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी सांघिक समन्वयही महत्त्वाचा असतो. दुर्दैवाने इराणचे खेळाडू या शैलीतही कमी पडले.
जपानला ‘क’ गटात स्थान देण्यात आले होते. या गटात त्यांना ग्रीस, आयव्हरी कोस्ट व कोलंबिया यांच्याशी झुंज द्यायची होती. आश्चर्यजनक विजय नोंदविण्याची क्षमता जपानकडे आहे, मात्र त्यांच्या खेळाडूंमध्ये अपेक्षेइतकी भेदकता नव्हती. जपानकडे किसुके होंडासारखे अनेक अनुभवी खेळाडू असूनही त्यांची जादू यंदा दिसून आली नाही. त्यांच्या चालींमध्ये विस्कळीतपणा होता तसेच प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याइतकी भेदकताही नव्हती. ग्रीसविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. या सामन्याचा अपवाद वगळता अन्य लढतीत त्यांच्या आक्रमणात फारशी धार नव्हती. वैयक्तिक खेळावरच त्यांच्या खेळाडूंची भिस्त होती.
दक्षिण कोरियाला ‘ह’ गटात रशिया, अल्जेरिया व बेल्जियम यांचे आव्हान होते. रशिया व कोरिया हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. मात्र अन्य दोन लढती कोरियाने गमावल्या. सांघिक समन्वयात त्यांचे खेळाडू कमी पडले. त्याचबरोबर त्यांच्या खेळाडूंमध्ये वैयक्तिक खेळावर भर दिला जात होता. फुटबॉल हा एकटय़ाने खेळावयाचा खेळ नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कोरियन खेळाडूंनी आक्रमणाच्या शैलीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. चेंडू जमिनीवर ठेवूनही भरघोस यश मिळवता येते हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.  
ऑस्ट्रेलियाची यंदाची कामगिरी अतिशय असमाधानकारक ठरली. त्यांनी ‘ब’ गटात चिली, नेदरलँड्स, स्पेनविरुद्धचे सामने गमावले. या तीनही सामन्यांत त्यांच्या खेळाडूंनी खूपच चुका केल्या. त्याचा फायदा त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना झाला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या चालींमध्ये भेदकता नव्हती तसेच त्यांच्या चाली आश्वासक नव्हत्या व त्यांच्या खेळात अव्वल आणि प्रभावी दर्जाही नव्हता. तूर्तास, आशियाई संघांपुरता विश्वचषक संपला आहे. पुढील विश्वचषकात आशियाचे किती देश पात्र ठरतात आणि त्यापैकी कोणते संघ साखळीचा टप्पा ओलांडतात, याचीच आता वाट पाहावी लागणार आहे.