‘जर-तर’ची समीकरणे आता संपली.. आता थेट भिडायचे, प्रतिस्पध्र्याला नेस्तनाबूत करायचे, अशी वेळ येऊन ठेपली आहे. कारण बाद फेरीला सुरुवात झाली असून या फेरीतला पहिलाच सामना रंगणार आहे, तो यजमान ब्राझील आणि गतविजेत्यांना पराभूत करीत बाद फेरीत दिमाखात प्रवेश केलेल्या चिलीचा. आतापर्यंत दोन्ही संघांमधील ६८ सामन्यांमध्ये ४८ सामने ब्राझीलने जिंकले आहेत, यावरूनच या सामन्याचे भाकीत वर्तवणे तसे कठीण नाही. पण चिलीचा संघही धक्कादायक विजयाची नोंद करू शकतो आणि त्यांनी तसे करूनही दाखवले आहे. त्यामुळे यजमान ब्राझीलला चिलीचा तिखट जाणवणार का, हा प्रश्न साऱ्यांच्या मनात असेल.
साखळी फेरीमध्ये ब्राझीलने क्रोएशिया आणि कॅमेरून या दोन्ही संघांना पराभूत केले होते, तर मेक्सिकोबरोबरचा सामना बरोबरीत सुटला होता. ब्राझील जमिनीवरून खेळण्यासाठी प्रसिद्ध असला तरी त्यांनी कॅमेरूनविरुद्धच्या सामन्यांमध्ये हवाई हल्ल्यांवर भर देत आपली रणनीती बदलत साऱ्यांनाच धक्का दिला होता. त्यामुळे चिलीविरुद्धच्या सामन्यासाठी प्रशिक्षक लुईस स्कोलारी नेमकी कोणती रणनीती आखतात, यावर साऱ्यांचे लक्ष असेल. नेयमार चांगल्या फॉर्मात आहे, फ्रेडलाही फॉर्म गवसला आहे. पण थिआगो सिल्व्हा आणि दानी अल्वेस यांना अजूनही छाप पाडता आलेली नाही. ब्राझीलचे आक्रमण चांगले होत असले तरी त्यांना अपेक्षितरीत्या बचाव करता आलेला नाही. त्यामुळे स्कोलारी यांना बचावावर अधिक लक्ष द्यावे लागेल.
साखळी गटामध्ये चिलीने गतविजेत्या स्पेनला धक्का दिल्यामुळे फुटबॉल जगताच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत, आता ते ब्राझीलला धक्का देऊन इतिहास रचणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. चिलीचे आक्रमण चांगले दिसत असले तरी त्यांचा बचाव कमकुवत असल्याचे जाणवत आहे. कारण अखेरच्या साखळी सामन्यामध्ये नेदरलॅण्ड्सने दोन गोल लगावत ते दाखवून दिले आहे. १९६२ साठी स्वत:च्याच भूमीत झालेल्या विश्वचषकात चिलीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेली होती आणि या वेळी त्यांना ब्राझीलनेच पराभूत केले होते. यानंतर आतापर्यंत चिलीला उपांत्यपूर्व फेरीही गाठता आली नाही. पण ५२ वर्षांनी चिली आता इतिहास रचणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
ब्राझील वि. चिली
स्थळ : इस्टाडिओ मिनेइराओ, बेलो होरिझोंटे ल्ल वेळ : रात्री : ९.३० वा.
लक्षवेधी खेळाडू
नेयमार (ब्राझील) : ब्राझीलचा हुकमी एक्का, असे नेयमारला म्हटले जाते आणि आतापर्यंत विश्वचषकामध्येही चार गोल लगावत त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. गोल मारण्याबरोबरच गोल साहाय्य करण्यामध्ये नेयमारचा हातखंडा आहे. आपल्या चपळ आणि चाणाक्ष खेळाच्या जोरावर नेयमारने आतापर्यंत ब्राझीलला विजय मिळवून दिले आहेत आणि या सामन्यातही त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा असतील.
अर्टुरो व्हिडाल (चिली) : चिलीच्या संघातील आक्रमण, बचाव आणि मधल्या फळीत खेळणारा एकमेव खेळाडू म्हणजे अर्टुरो व्हिडाल. आतापर्यंत चिलीकडून खेळताना त्याने गोल करण्यासाठी साहाय्य केले आहे, त्याचबरोबर बचावही उत्तम केला आहे. संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यामध्ये व्हिडालची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर साऱ्यांचीच नजर असेल.
गोलपोस्ट
चिलीकडे अ‍ॅलेक्सी सांचेझ आणि अर्टुरो व्हिडालसारखे नावाजलेले खेळाडू आहेत. आतापर्यंत तांत्रिकदृष्टय़ा त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांच्या संघातील खेळाडू मोठा बदल नक्कीच घडवू शकतात आणि त्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही त्यांच्या खेळाचा अभ्यास केला असून सामन्याच्या निकाल आमच्याच बाजूने लागेल.
– फ्रेड, ब्राझील
ब्राझीलविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही चांगली तयारी केली आहे. सर्वानीच चांगला सराव केला आहे, त्याचबरोबर तांत्रिकदृष्टय़ाही आम्ही त्यांच्या खेळाचा अभ्यास केला आहे. बाद फेरीत आल्यामुळे संघाचे मनोबल चांगलेच उंचावलेले असून त्याचा नक्कीच फायदा आम्हाला होईल. ब्राझीलविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत.
-अ‍ॅलेक्सी सांचेझ, चिली

आमने-सामने
सामने : ३
ब्राझील :
३ विजय