News Flash

ब्राझील व जर्मनीला समान भाव

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. सट्टेबाजाराचे लक्षही आता ८ व ९ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यांवर आहे.

| July 7, 2014 01:40 am

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. सट्टेबाजाराचे लक्षही आता ८ व ९ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यांवर आहे. तोपर्यंत चारही संघांच्या भावात चढउतार होणार आहे. रविवारी ब्राझीलला ९० व जर्मनीला ९५ पैसे देऊ करणाऱ्या सट्टेबाजांनी आता दोन्ही संघांना समान भाव दिला आहे. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारानेही तोच कित्ता गिरवला आहे. आता अंतिम चषक कोण पटकावणार, यासाठी सट्टेबाजांनी अर्जेटिनाला कौल दिला आहे. जर्मनी आणि ब्राझील यांना दुसऱ्या क्रमांकाचे दावेदार ठरविण्यात आले आहेत. दोन्ही संघांसाठी समान भाव देऊ करण्यात आला आहे. नेदरलँड्स चौथ्या क्रमांकावर असून या संघाच्या भावातही फारसा फरक नसल्याचे दिसून येते. कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगेझ आजही सर्वाधिक गोलकर्ता म्हणून आपली जागा टिकवून आहे. त्यापाठोपाठ लिओनेल मेस्सी, रॉबिन व्हॅन पर्सी यांचा क्रमांक लागतो. ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमार जखमी झाल्याने आता सट्टाबाजारातून त्याचे नाव गायब झाले आहे. अंतिम फेरीत कोणते संघ येतील, यासाठीही सट्टाबाजारात जोरदार उलाढाल सुरू आहे. जर्मनी आणि अर्जेटिना या संघांना सट्टेबाजांनी पसंती दिली आहे.
उपांत्य फेरीतील सामन्यांचे आजचे भाव
ब्राझील    जर्मनी
९० पैसे (९/५)    ९० पैसे (९/५)
नेदरलँड्स    अर्जेटिना
दीड रुपया (२३/१०)    ७० पैसे (२९/२०)

तीन फुटबॉल चाहते चकमकीत जखमी
कोस्टा रिकाची राजधानी सॅन जोसेमध्ये फुटबॉल सामना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे चकमकीत पर्यवसान झाले. या चकमकीत दोघांवर चाकूने, तर तिसऱ्यावर काचेच्या बाटलीने हल्ला करण्यात आला. या तिन्ही जखमी चाहत्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. पोलिसांनी या हिंसाचारप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले असून, हत्यारे बाळगल्याप्रकरणी एकाचा शोध घेत आहेत. प्लाझा डी ला डेमोकॅ्रशिया या ठिकाणी नेदरलँड्स आणि कोस्टा रिका यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना मोठय़ा एलईडी स्क्रीनवर पाहण्यासाठी एक हजारहून अधिक चाहते जमले होते. या घटनेनंतर गंभीर अवस्थेतच तिघांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी  जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा तपास सुरू आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
किती काहीही झाले तरी आपल्या सख्याला सोडायचे नसते. ब्राझील फुटबॉलमय झाली आहे, रस्त्यांवर सामना पाहण्यासाठी लोक तोबा गर्दी करतात. आपल्या या लाडक्या सख्यालाही हा सामना पाहता यावा, यासाठी या चाहत्याने चक्क त्याला डोक्यावर घेतले. गर्दी पाहून हा कोंबडाही बिथरला नाही, आपल्या सख्याच्या डोक्यावर बसून त्याने सामन्याचा आनंद लुटला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:40 am

Web Title: fifa world cup 2014 brazil vs germany
Next Stories
1 शूटआउट @ साल्वाडोर!
2 रणनीतीमध्ये आता बदल हवा!
3 आजोबांच्या मृत्यूच्या दु:खावर मात करून मार्सेलोचे सरावाला प्राधान्य!
Just Now!
X