News Flash

रणनीतीमध्ये आता बदल हवा!

सामना जिंकण्यासाठी खेळ महत्त्वाचा असतोच, पण त्याचबरोबर महत्त्वाची असते ती रणनीती. कारण जर तुमच्याकडे चांगली रणनीती नसेल तर तुमचे पानिपत होऊ शकते.

| July 7, 2014 01:34 am

सामना जिंकण्यासाठी खेळ महत्त्वाचा असतोच, पण त्याचबरोबर महत्त्वाची असते ती रणनीती. कारण जर तुमच्याकडे चांगली रणनीती नसेल तर तुमचे पानिपत होऊ शकते. त्याचबरोबर विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेमध्ये एकच रणनीती कायम ठेवून चालत नाही. कारण प्रतिस्पध्र्याची तुमच्यावर करडी नजर असते. त्यामुळे तुमच्याकडे एकच रणनीती असेल तर तिचा चोख अभ्यास करून ती मोडीत काढली जाऊ शकते. साखळी फेरीतून बाद फेरीत आल्यावर एक रणनीती पाहायला मिळाली आणि ती म्हणजे सामन्याच्या पहिल्या १५-२० मिनिटांमध्ये गोल करायचा आणि त्यानंतरच्या ७० मिनिटांमध्ये बचावावर भर देत सामना जिंकायचा. साखळी फेरीनंतरच्या सामन्यांमध्ये असेच पाहायला मिळाले आहे. कारण विश्वचषकातील बाद फेरींच्या सामन्यांमध्ये एक गोलही महत्त्वाचा असतो. तो पहिल्या २० मिनिटांमध्ये केला की प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकता येते आणि सामना जिंकता येता. आता उपांत्य फेरीमध्ये चारही संघ बलाढय़ आहेत. त्यामुळे त्यांनी या रणनीतीचा चांगला अभ्यास केला असेल. त्यामुळे आता पुढे जो संघ रणनीती बदलेल त्यालाच सामना जिंकण्याची अधिक संधी असेल.
उपांत्यपूर्व फेरीमध्ये अर्जेटिनाकडून हीच रणनीती वापरली. बेल्जियमने चांगला बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. पण गोंझालो हिग्युएनने मारलेला गोल अप्रतिमच होता, त्याला तोडच नव्हती. त्याच्या फटक्याचे उत्तर बेल्जियमकडे नव्हते. पहिला गोल मारल्यावर अर्जेटिनाने बचावावर भर दिला. त्यांचा बचाव चांगला मानला जात नाही, कारण त्यांच्या बचावामध्ये बऱ्याच त्रुटी दिसून येतात. पण त्यांनी या सामन्यामध्ये बेल्जियमला जास्त आक्रमण करू दिले नाही. बेल्जियमने बचाव करताना लिओनेल मेस्सीचा चांगलेच जखडून ठेवले होते. त्यामुळेच त्याला गोल करण्याच्या संधी मिळाल्या नाहीत. पण अर्जेटिनाच्या अन्य खेळाडूंनी चांगले आक्रमण केले असले तरी बेल्जियमने ते शिताफीने रोखले. बेल्जियमने आक्रमणही चांगले केले, पण त्यांना संधीचा फायदा उचलता आला नाही.
कोस्टा रिका आणि नेदरलँड्स यांचातला सामना अप्रतिम झाला, त्यामध्ये कोस्टा रिकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण कोस्टा रिकाचा संघ नावाजलेला नक्कीच नाही, शिवाय संघात एकही मोठा खेळाडू नाही. पण तरीही त्यांनी नेदरलँड्ससारख्या दादा संघाला निर्णायक वेळेत एकही गोल करू दिला नाही, हे कौतुकास्पद असेच आहे. कारण नेदरलँड्सकडे रॉबिन व्हॅन पर्सी, अर्जेन रॉबेन, वेस्ले श्नायडरसारखे एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत आणि तिघेही चांगल्या फॉर्मात आहेत. पण कोस्टा रिकापुढे या तिघांपैकी एकालाही गोल करता आला नाही. नेदरलँड्ससाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. कारण संघ दमदार असला तरी बाद फेरीनंतर त्यांच्यावर दडपण वाढत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. त्यामुळे कोस्टा रिकासारखा छोटय़ा संघापुढेही त्यांना निर्णायक वेळेत गोल करता आला नाही. आता त्यांची खरी परीक्षा अर्जेटिनासमोर असेल.
अर्जेटिना आणि नेदरलँड्स हे दोन्ही मातब्बर संघ आता उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नेदरलँड्स मेस्सीला कशी रोखते आणि त्याला रोखताना अन्य आक्रमणपटूंचा बंदोबस्त कसा करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर दुसरीकडे अर्जेटिनाचा बचाव चांगला दिसत नाही. नेदरलँड्स हा आक्रमणासाठी ओळखला जातो, त्यामुळे अर्जेटिनाला बचावावर अधिक भर द्यावा लागेल. उपांत्य फेरीच्या सामन्यात जो आपली रणनीती बदलून तिचा योग्य अवलंब करील आणि कच्च्या दुव्यांवर मेहनत घेऊन ते दूर करील, त्यांनाच अंतिम फेरीत पोहोचण्याची नामी संधी असेल.
(लेखक फुटबॉल प्रशिक्षक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:34 am

Web Title: fifa world cup 2014 changed strategy
Next Stories
1 आजोबांच्या मृत्यूच्या दु:खावर मात करून मार्सेलोचे सरावाला प्राधान्य!
2 जिंकलो रे!
3 गड आला, पण सिंह गेला..
Just Now!
X