News Flash

पहिले महायुद्ध!

स्पेन आणि नेदरलँड्स हे युरोपातील दोन्ही दिग्गज संघ.. २०१०च्या फिफा विश्वचषकात अनेक खाचखळग्यांचा प्रवास करून अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले..

| June 13, 2014 05:55 am

स्पेन आणि नेदरलँड्स हे युरोपातील दोन्ही दिग्गज संघ.. २०१०च्या फिफा विश्वचषकात अनेक खाचखळग्यांचा प्रवास करून अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले.. विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न साकारण्यासाठी उत्सुक असलेले.. पण आंद्रेस इनियेस्टाने अतिरिक्त वेळेच्या चार मिनिटांआधी गोल करून स्पेनला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि नेदरलँड्सचे विश्वचषक पटकावण्याचे स्वप्न भंगले.. आता बरोबर चार वर्षांनी हे दोन्ही संघ फिफा विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत आमने-सामने उभे ठाकले आहेत. या महामुकाबल्यात स्पेनचे पारडे जड असले तरी गेल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी नेदरलँड्स संघ उत्सुक आहे.
‘ब’ गटातील साल्वाडोर एरिना फोन्टे नोवा येथे होणाऱ्या या सामन्यात नेदरलँड्सच्या संघात कर्णधार रॉबिन व्हॅन पर्सी, आर्येन रॉबेन, वेस्ली श्नायडर, नायजेल डे लाँग आणि डिर्क क्युयट हे पाचच खेळाडू २०१०च्या संघातील शिल्लक राहिले आहेत. वेस्ले श्नायडर या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे शतक पूर्ण करणार आहे. ‘‘त्या पराभवाच्या स्मृती अजूनही कायम आहेत. त्यातून आम्ही अद्याप सावरलेलो नाहीत. जेव्हा फुटबॉलचा विषय निघतो, त्यावेळी या पराभवामुळे माझी मान शरमेने खाली जाते,’’ असे श्नायडर सांगतो. ब्राझीलमध्ये दाखल झाल्यानंतर व्हॅन पर्सीच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता निर्माण झाली होती. पण तो लवकरच तंदुरुस्त होईल, अशी आशा नेदरलँड्सला आहे. स्पेनचे आक्रमण रोखण्यासाठी प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल हे या सामन्यासाठी ५-३-२ ही व्यूहरचना अवलंबणार आहेत. साल्वाडोरविरुद्धच्या सामन्यासाठी व्हॅन गाल यांनी ४-४-२ अशी व्यूहरचना वापरली होती. त्यामुळे स्पेन संघ काहीसा गोंधळात आहे. नेदरलँड्सचा बचाव कमकुवत असला तरी त्यांच्या आक्रमणाची भिस्त श्नायडर, रॉबेन आणि व्हॅन पर्सी यांच्यावरच असणार आहे.
लागोपाठ दोन वेळा युरो चषक आणि २०१० विश्वचषक जिंकणारा विन्सेन्ट डेल बॉस्के यांच्या प्रशिक्षकपदाखालील स्पेन संघ ब्राझील आणि इटलीप्रमाणे सलग दोन विश्वचषक जिंकण्यासाठी आतूर आहे. त्यामुळेच या विश्वचषकासाठी संघ निवडताना बॉस्के यांनी २०१२ युरो चषक विजेत्या संघात फक्त एक बदल केला आहे. अल्वारो अर्बेलोआच्या जागी त्यांनी सेसार अझ्पिलिक्युएटा याला संधी दिली आहे. नेदरलँड्सच्या आक्रमणाला थोपवू शकतील, अशी भक्कम बचावफळी स्पेनकडे आहे. गेरार्ड पिक, सर्जीओ रामोस, जॉर्डी अल्बा या बचावफळीवर स्पेनची भिस्त आहे. आक्रमणात त्यांच्याकडे फर्नाडो टोरेस, डेव्हिड व्हिला, दिएगो कोस्टा असे पर्याय आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2014 5:55 am

Web Title: fifa world cup 2014 first world war
Next Stories
1 स्पेनची फिनिक्सभरारी!
2 विश्वचषक.. नाय, नो, नेव्हर!
3 ‘ब्रँड मेस्सी’ तेजीत!
Just Now!
X