बाद फेरीसाठी दोन्ही संघांचे अस्तित्व पणाला.. आयव्हरी कोस्टला बाद फेरी गाठण्यासाठी बरोबरी पुरेशी.. ग्रीसला मात्र विजयाची नितांत आवश्यकता.. ९१व्या मिनिटांपर्यंत १-१ अशी बरोबरी.. त्यामुळे आयव्हरी कोस्टचा बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झालेला.. पण अवघ्या काही सेकंदांत ग्रीसने कमाल केली आणि सामना आपल्या बाजूने झुकवत फिफा विश्वचषकाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. केवळ दोन वेळा विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या ग्रीसने आयव्हरी कोस्टवर २-१ असा थरारक विजय मिळवत पहिल्यांदाच बाद फेरीत धडक मारण्याची करामत साधली.
ऑलिम्पिक स्पर्धाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ग्रीसला आतापर्यंत ऑलिम्पिकनंतरच्या जगातील सर्वोत्तम क्रीडा सोहळ्यात पहिल्याच फेरीतून पराभूत व्हावे लागत होते, मात्र या वेळी त्यांनी भरपाई वेळेत गोल करून इतिहास घडवला. सामना १-१ अशा बरोबरीत असताना ९१व्या मिनिटाला आयव्हरी कोस्टच्या जिओवानी सिओ याने ग्रीसच्या पेनल्टी क्षेत्रात जॉर्जियस समरसला हलकासा धक्का दिला. पण पंचांनी थेट पेनल्टी-किकचा निर्णय दिला. ग्रीसला बाद फेरीची सुवर्णसंधी मिळाली असताना समरसने कोणतीही चूक न करता चेंडू उजव्या बाजूने गोलजाळ्यात ढकलला आणि ग्रीसच्या खेळाडूंसह चाहत्यांनी एकच जल्लोष केला. बाद फेरीत जाण्यासाठी बरोबरी पुरेशी असताना अखेरच्या क्षणी पराभूत व्हावे लागल्याने आयव्हरी कोस्टचे चाहते निराश झाले.
ग्रीसला या सामन्यात चांगली सुरुवात करता आली नव्हती. पॅनाजिओटिस कोने याचा गुडघा दुखावल्यामुळे त्याला १२व्या मिनिटालाच मैदान सोडावे लागले, पण त्याच्या जागी संधी मिळालेल्या आंद्रियास समारिसने ४२व्या मिनिटाला ग्रीसला आघाडी मिळवून दिली. आयव्हरी कोस्टचा बचावपटू चेईक टिओटे याने दिलेल्या चुकीच्या पासवर समारिसने चेंडूवर ताबा मिळवला. त्यानंतर हळूहळू चेंडू पुढे सरकवत तो आयव्हरी कोस्टच्या गोलक्षेत्रात पोहोचला. गोलरक्षक बौबाकार बॅरी पुढे आल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने हळुवारपणे चेंडू गोलजाळ्यात ढकलला. ग्रीसला ६८व्या मिनिटाला आघाडी आणखी मजबूत करण्याची संधी चालून आली होती, पण जॉर्जियस कारागौनिस याने मारलेला फटका गोलजाळ्याच्या बाजूने गेला.
ग्रीस सामन्यावर पकड मिळवत आहे, असे चित्र असतानाच विल्फ्रेड बोनी याने आयव्हरी कोस्टला बरोबरी साधून देणारा गोल केला. ७४व्या मिनिटाला याया टौरेने लांबून दिलेल्या पासवर जिओवानीने चेंडूवर ताबा मिळवला. जिओवानीला स्वत:च गोल करता आला असता, पण त्याने नि:स्वार्थपणे चेंडू बोनीकडे सरकवला. बोनीने कोणतीही चूक न करता गोल लगावला. क गटात कोलंबियाने तिन्ही सामने जिंकून नऊ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले आहे. ग्रीसने एक विजय आणि एक सामना बरोबरीत सोडवत चार गुणांसह दुसरे स्थान पटकावून दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. आयव्हरी कोस्टला तीन गुणांसह तिसऱ्या तर जपानला एक गुणासह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.