ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखा मोठा खेळाडू ताफ्यात.. जेतेपदासाठीच्या दावेदारांमध्ये पोर्तुगालची गणना.. परंतु प्रत्यक्षात मात्र पोर्तुगालची विश्वचषकातील वाटचाल चिंतेत आहे.. पोर्तुगालने घानावर मोठय़ा फरकाने शानदार विजय मिळवला आणि अमेरिका-जर्मनी लढत निर्णायक ठरल्यास त्यांना बाद फेरीची संधी मिळू शकेल. त्यामुळे पोर्तुगालला घानाविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे.
रोनाल्डो गुडघ्याच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होत आहे. तो ९० मिनिटे मैदानावर असतो. मात्र एरव्ही त्याच्या गोल करण्यातील कौशल्य हरवल्यासारखे वाटते आहे. त्याचा साथीदार पेपेला लाल कार्ड मिळाल्यामुळे खेळता येणार नाही. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याचे आव्हान पोर्तुगालसमोर आहे.
घानाने आपल्या नैसर्गिक कौशल्याला मेहनतीची जोड देत आगेकूच केली आहे. अमेरिकेने मात केल्यानंतर त्यांनी जर्मनीसारख्या बलाढय़ संघाला बरोबरीत रोखले. पोर्तुगालला नमवत बाद फेरी गाठण्याचे त्यांचे ईप्सित आहे.
सामना क्र. ४६
‘ग’ गट : पोर्तुगाल विरुद्ध घाना
स्थळ : ब्राझिलिया, इस्टाडिओ नॅसिओनल   ल्ल वेळ : रात्री ९.३० वा.
लक्षवेधी खेळाडू
ख्रिस्तियानो रोनाल्डो (इंग्लंड) : पोर्तुगाल म्हणजे रोनाल्डो, हे समीकरण विश्वचषकाच्या आधीपासून मांडले जात होते. मात्र रिअल माद्रिदसाठी चमकदार कामगिरी करणारा रोनाल्डो विश्वचषकात मात्र अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. आतापर्यंत गोलसाठी साहाय्य करण्यात त्याने अचूक कामगिरी केली आहे, मात्र आता त्याचे अपयश पोर्तुगालचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आणू शकते. त्यामुळे त्याच्यावर सर्व भिस्त आहे.
असामोह ग्यान (घाना) : कर्णधार आणि अनुभवी खेळाडू म्हणून ग्यान घानाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. गोल करण्यासाठीची मेहनत आणि गोल साहाय्य करण्यासाठीची धडपड हे असामोहचे वैशिष्टय़ आहे. घानाला बाद फेरी गाठायची असेल तर ग्यानच्या कामगिरीवर बरेच काही अवलंबून राहावे लागेल.

गोलपोस्ट
आम्ही विश्वविजेते होऊ असे मला कधीही वाटले नाही. आम्हाला सत्याचा सामना करून आमच्या मर्यादा ओळखायला हव्यात. तूर्तास आमच्यापेक्षा चांगला खेळ करणारे खेळाडू आणि संघ आहेत.  
-ख्रिस्तियानो रोनाल्डो, पोर्तुगाल

जर्मनीविरुद्ध आम्ही सर्वस्व झोकून देऊन खेळ केला. जर्मनीसारख्या मातब्बर संघाविरुद्धची लढत आम्ही बरोबरीत सोडवली. पोर्तुगालविरुद्ध आम्हाला आणखी एक संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम खेळ करू. आम्ही बाद फेरीसाठी पात्र ठरलो नाही तर त्याचा अर्थ आम्ही कौशल्यात कमी पडलो असा होत नाही.
हॅरिसन अफुल्ल, घाना