मारियो बालोटेलीने वेडेपणाने पाडलेल्या एका ठिणगीमुळे घर पेटले होते, हे संपूर्ण जगाने अनुभवले होते. तीन वर्षांपूर्वी मँचेस्टर सिटीचा खेळाडू असलेल्या बालोटेलीने आपल्या चेरीशायर अपार्टमेंटमधील घराच्या बाथरूममध्ये फटाका फोडला होता. या फटाक्यामुळे त्याचे तीन दशलक्ष युरोचे घर जळाले होते. आता मनाऊस येथील एरिना द अ‍ॅमाझोनिया स्टेडियमवरील बालोटेलीच्या एका ठिणगीमुळे संपूर्ण इटली देश आनंदाने न्हाऊन निघाला. रविवारी पहाटे इंग्लंडविरुद्धच्या लढतीत बालोटेलीने ५०व्या मिनिटाला हेडरद्वारे केलेल्या गोलमुळे इटलीला २-१ असा विजय साकारता आला.
दोन्ही संघांनी पहिली ३० मिनिटे गंभीर खेळ केल्यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत सुटेल, असे वाटले होते. इंग्लंडचा कर्णधार स्टीव्हन गेरार्डने गॅरी काहिल आणि फिल जॅगिएल्का या मध्य बचावपटूंसह भक्कम भिंत इटलीच्या आक्रमणापुढे उभी केली होती. पहिली २७ मिनिटे बालोटेली शांत असल्यामुळे सामन्यातील रंगत निघून गेली होती. २७व्या मिनिटाला बालोटेलीने पहिल्यांदा इंग्लंडच्या गोलक्षेत्रात आक्रमण केले, त्याने मारलेला फटका गोलबारच्या वरून गेला. पण खऱ्या अर्थाने सामन्यात रंग भरण्यास सुरुवात झाली. त्याआधी इटलीच्या मधल्या फळीचे आधारस्तंभ आंद्रिया पिलरे आणि डॅनियल डे रोस्सी हे जॉर्जियो चेलिनी, क्लॉडियो मार्चिसियो, अँटोनियो कँड्रेव्हा आणि मट्टेओ डार्मियान यांच्यासह चेंडूवर ताबा मिळवत होते. पण बालोटेलीच्या या प्रयत्नांमुळे ‘अझ्झुरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इटलीचे इंजिन सुसाट निघाले. ३३व्या मिनिटाला डे रोस्सीच्या प्रयत्नांमुळे चेंडू बालोटेलीकडे आला. पण बालोटेलीला हेडरद्वारे हा चेंडू इंग्लिश गोलरक्षक जो हार्टला चकवून गोलजाळ्यात धाडता आला नाही. पण एका मिनिटानंतरच अझ्झुरींना त्याचे फळ मिळाले. बालोटेलीने कॉर्नरवरून मारलेल्या फटक्यावर इंग्लंडचे बचावपटू कर्णधार पिलरेला रोखण्यासाठी पुढे सरसावले असताना मार्चिसियोने इटलीसाठी पहिला गोल केला. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही.
तीन मिनिटांनंतर मैदानावरील सर्वात कल्पक खेळाडू रहिम स्टर्लिगने डाव्या बाजूला एकमेव असलेल्या वेन रूनीकडे चेंडू सोपवला. रूनीने अखेपर्यंत चेंडू गोलक्षेत्रात घेऊन जात डॅनियल स्टरिजकडे पास दिला. उजव्या पायाने चेंडूवर नियंत्रण साधल्यानंतर स्टरिजने आंद्रिया बार्झाग्ली आणि गॅब्रियल पॅलेट्टा या सेंटर-बॅकना चकवत इंग्लंडसाठी बरोबरी साधणारा गोल केला. इटलीचा अव्वल गोलरक्षक गियानलुइगी बफन याच्या जागी संधी मिळालेल्या साल्वाटोर सिरिगू याला हा गोल अडवता आला नाही.
बऱ्याच वेळेला स्टर्लिग, स्टरिज आणि डॅनी वेलबॅक हे इंग्लंडला आघाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. पण अखेर बालोटेलीने ती संधी साधली. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाल्याच्या पाच मिनिटांनंतर बालोटेली नावाचा करिश्मा पुन्हा पाहायला मिळाला. या वेळी अँटोनियो कांड्रिव्हाच्या पासवर बालोटेलीने गोल करून इटलीला निर्णायक आघाडी मिळवून दिली. २० मिनिटांनंतर प्रशिक्षक सेसार प्रांडेली यांनी बालोटेलीला माघारी बोलावले. बालोटेलीने विजयाची इमारत बांधली होती. अशा अनेक इमारती त्याला यापुढे बांधायच्या आहेत.

वृत्तपत्रे म्हणतात
इंग्लंड वि. इटली सामन्याविषयी
* गोंधळात टाकणारा इंग्लंडचा पराभव – डेली मेल
* वय व संस्कृतीमधील लढा इंग्लंडने गमावला    – द संडे टाइम्स
* इटालियन हुंदके, हॉजसन यांचे वाघ धारातीर्थी    – द सन