11 August 2020

News Flash

इटली (ड-गट) : वादग्रस्त!

ब्राझीलनंतर सर्वाधिक फिफा विश्वचषक जिंकणारा संघ आणि युरोपीयन राष्ट्रांमधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणजे इटली.

| May 20, 2014 12:57 pm

ब्राझीलनंतर सर्वाधिक फिफा विश्वचषक जिंकणारा संघ आणि युरोपीयन राष्ट्रांमधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणजे इटली. फिफाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये जेतेपद पटकावण्याची कायम आस बाळगल्यामुळे इटलीने आतापर्यंत तब्बल चार वेळा फिफा विश्वचषकावर नाव कोरले आहे. सलग दोन वेळा विश्वचषक जिंकणारा इटली हा ब्राझीलनंतर दुसरा देश ठरला आहे. अनेक वेळा वादग्रस्त घटनांचा धनी असलेला ‘आझ्झुरी’ म्हणून ओळखला जाणारा इटली संघ जवळपास प्रत्येक विश्वचषकात सहभागी झाला आहे.
मैदानावरील किंवा मैदानाबाहेरील वाद असोत, इटली आणि वाद हे जवळपास प्रत्येक विश्वचषकात एक समीकरणच बनले आहे. पण युरो २०१२ स्पर्धेसाठी २०१०मध्ये इटली संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सेसारे प्रांडेली यांनी इटली संघाच्या खेळाची शैलीच बदलून टाकली आहे. क्लब प्रशिक्षक म्हणून फारसे यशस्वी न ठरलेल्या प्रांडेली यांनी २०१२च्या युरो चषक मोहिमेत इटलीला अनपेक्षित यश मिळवून दिले. इटलीला अंतिम फेरीत धडक मारून देताना स्पर्धेत अपराजित राहिलेल्या विश्वचषक विजेत्या स्पेनला पराभूत करणे त्यांना जमले नाही.
फ्रान्सचा महान खेळाडू झिनेदिन झिदानच्या डुक्करडुशी (हेडबट) प्रकरणामुळे इटलीला २००६मध्ये फिफा विश्वचषकाचे जेतेपद मिळवता आले. या संघातील गियानलुइगी बफन आणि आंद्रियो पिर्लो या दोन खेळाडूंवर इटलीच्या यशापयशाची प्रमुख जबाबदारी असणार आहे. ३४ वर्षीय पिर्लो हा जगातील सर्वात धोकादायक आणि सर्वात हुशार असा मधल्या फळीतील खेळाडू समजला जातो. मैदानावरील वावर आणि अफाट अनुभव यामुळे पिर्लो हा इटलीसाठी महत्त्वपूर्ण खेळाडू ठरणार आहे. प्रशिक्षक प्रांडेली यांनी फिफा विश्वचषकासाठी नव्या दमाच्या खेळाडूंचा इटली संघ तयार केला असून, या संक्रमणाच्या कालावधीचा साक्षीदार म्हणजे गोलरक्षक गियानलुइगी बफन. या शतकातील महान गोलरक्षक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या बफनचे वय आणि फॉर्मबाबत प्रश्नचिन्ह असले तरी विश्वचषकासाठी तोच पहिल्या पसंतीचा गोलरक्षक आहे, यावर प्रांडेली यांनी शिक्कामोर्तब केले आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केल्यापासून २४ वर्षीय मारियो बालोटेल्ली हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कायम चर्चेत राहिला आहे. पण त्याच्यातील अफाट गुणवत्ता नाकारता येणार नाही. बालोटेल्लीसारखा आघाडीवीर संघात असणे गरजेचे आहे. ऊर्जा, वेग आणि शारीरिक मजबूती यामुळे तो प्रतिस्पध्र्याचा बचाव सहज मोडून काढू शकतो.
पात्रता फेरीत इटलीसमोर डेन्मार्क, चेक प्रजासत्ताक आणि बल्गेरिया, अर्मेनिया आणि माल्टाचे आव्हान होते. या टप्प्यात दहापैकी सहा लढती जिंकत इटलीने गटात अव्वल स्थान राखले. गटात अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला ‘युएफा’ विभागातून विश्वचषकाचे थेट तिकीट मिळण्याचा नियम असल्याने इटलीचा ब्राझीलवारीचा मार्ग सुकर झाला.
अपेक्षित कामगिरी
‘ड’ गटात उरुग्वे आणि इंग्लंडसारखे बलाढय़ संघ असले तरी इटली संघ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर दुसऱ्या फेरीत मजल मारेल, यात कोणतीही शंका नाही. ‘ड’ गट हा या विश्वचषकात ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणून ओळखला जात आहे. दमदार कामगिरी करणारा उरुग्वे, कोणत्याही क्षणी कामगिरी उंचावणारा इंग्लंड आणि गटात अव्वल स्थानासाठी दावेदार असणाऱ्या इटलीमुळे या गटात आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळणार आहेत. इटली संघ विश्वचषक विजेतेपदासाठी दावेदार नसला तरी त्यांची घोडदौड उपांत्य फेरीपर्यंत असणार आहे. २०१२च्या युरो चषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणारा इटली संघ त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहे.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
आतापर्यंत अभेद्य बचाव ही इटलीची भक्कम बाजू राहिली असली तरी या वेळी त्यांची मुख्य भिस्त मधल्या फळीवर असणार आहे. आंद्रिया पिर्लो या जादुई खेळाडूबरोबरच मार्को वेराट्टा याची कामगिरी इटलीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आघाडीच्या फळीत फक्त मारियो बालोटेल्ली हा एकमेव योग्य पर्याय असल्यामुळे इटलीची आघाडीची फळी कमकुवत मानली जात आहे. अँटोनियो कस्सानोची या मोसमातील कामगिरी चांगली झाली असली तरी बरेच महिने तो इटलीकडून खेळला नसल्यामुळे संघाच्या खेळण्याच्या शैलीत तो कितपत योग्य ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. डॅनियल डे रोस्सी हासुद्धा दुखापतीतून संघात परतला आहे.
* फिफा क्रमवारीतील स्थान :
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : १८ वेळा (२०१४ सह)
* जेतेपद : १९३४, १९३८, १९८२, २००६
*  उपविजेतेपद : १९७०, १९९४
*  तिसरे स्थान: १९९०
*  चौथे स्थान : १९७८
*  उपांत्यपूर्व फेरी :१९९८
संभाव्य संघ
गोलरक्षक : गियानलुइगी बफन, मट्टिआ पेरिन, सॅल्वाटोरे सिरिगू, अँटोनियो मिरान्टे. बचाव फळी : इग्नाटियो अबाटे, आंद्रिया बार्झाग्ली, लिओनाड्रो बोनूक्की, जॉर्जियो चिएलिनी, मट्टेओ डार्मिएन, मट्टिआ डे स्किग्लिओ, ख्रिस्तियान मॅगीओ, गॅब्रियल पॅलेट्टा, मॅन्युअल पास्कल, आंद्रिया रँकोचिया. मधली फळी : अल्बटरे अकिलानी, डॅनियल डे रोस्सी, क्लॉडियो मार्चिसियो, रिकाडरे माँटेलिव्हो, थिआगो मोट्टा, मार्को पारोलो, आंद्रिया पिलरे, रोमूलो, मार्को वेराट्टी. आघाडीची फळी :  मारियो बालोटेल्ली, अँटोनियो कस्सानो, अलेसांड्रो सेर्सी, मट्टिआ डेस्ट्रो, सिरो इमोबिले, लोरेन्झो इसिग्ने, गिऊसेप्पे रोस्सी.
*  स्टार खेळाडू :  मारियो बालोटेल्ली, गियानलुईगी बफन, आंद्रिया पिर्लो, गिऊसेप्पे रोस्सी, डॅनियल डे रोस्सी.
व्यूहरचना : ३-५-२, ४-३-३ किंवा ४-४-२
*  प्रशिक्षक : सेसार प्रांडेली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2014 12:57 pm

Web Title: fifa world cup 2014 italy d group controversial
Next Stories
1 कोलकाताची टक्कर चेन्नईशी
2 बचेंगे तो और भी लढेंगे!
3 फिरकी चक्रव्यूहात राजस्थान अडकले
Just Now!
X