मेक्सिको आणि कॅमेरून हे दोन्ही संघ फॉर्मच्या चक्रव्यूहात अडकले असले तरी विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या सामन्यात विजय मिळवत एखादा धक्कादायक विजय मिळवल्यास या दोन्ही संघांपैकी एकाला बाद फेरीचे दरवाजे खुले होऊ शकतात, पण त्यासाठी पहिल्या सामन्यात बाजी कोण मारणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
ब्राझीलचे तिकीट मिळालेला मेक्सिकोचा संघ सुदैवी आहे, असे म्हटले जात आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना छाप पाडता आलेली नाही. बोस्निया आणि पोर्तुगाल यांच्यामधील मैत्रीपूर्ण सामन्यामध्येही मेक्सिकोला चमक दाखवता आलेली नाही. सामन्याच्या शेवटच्या अध्र्या तासामध्ये सामने गमवावे लागले आहेत, त्यामुळे यावर मेक्सिकोला लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर ५-३-२ ही व्यूहरचना आतापर्यंत त्यांनी आखली असली तरी त्यामध्ये काही बदल करणे गरजेचे वाटत आहे.
गेल्या विश्वचषकात एकही गुण न कमावता कॅमेरूनला बाहेर पडावे लागले होते. तीन सामन्यांमध्ये त्यांना एकदाही छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे हे गरजणारे ‘आफ्रिकन सिंह’ या वेळी तरी बरसणार का, हा प्रश्न साऱ्यांपुढे असेल. आपल्या रांगडय़ा खेळाने प्रतिस्पध्र्याला धडकी भरवणारा कॅमेरूनचा संघ या दहशतीचे गोलसह विजयामध्ये रूपांतर करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.