बाद फेरीत कोणताही संघ कोणत्याही दिग्गज संघाला कडवी झुंज देऊ शकतो, हे पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाले. त्यामुळे फ्रान्सने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली असली तरी त्यांनी नायजेरियाचा धसका घेतला असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे नायजेरियाकडे प्रतिस्पध्र्याला धक्का देण्याची कुवत आहे. नायजेरियाने फ्रेंच परीक्षा पास केल्यावरच त्यांना उपांत्यपूर्व फेरीत पोहोचता येईल.
साखळी फेरीमध्ये फ्रान्सने होंडुरासला ३-० असे पराभूत केले होते, तर स्वित्र्झलडचा ५-२ असा धुव्वा उडवला होता, तर इक्वेडोरबरोबर त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. फ्रान्सच्या संघात चांगला समन्वय आणि अनुभव आहे.
नायजेरियाने साखळी फेरीत बोस्निया आणि हझ्रेगोव्हिनावर एकमेव विजय मिळवला होता. इराणबरोबर गोलशून्य बरोबरी व अर्जेटिनाविरुद्धचा सामना त्यांना २-३ असा गमवावा लागला होता. अर्जेटिनाला कडवी झुंज दिल्यामुळे त्यांचे मनोबल काही प्रमाणात उंचावलेले असेल. दोन्ही संघांचा फॉर्म आणि खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केल्यास, फ्रान्सचा संघ अधिक सक्षम दिसत असून त्यांचेच पारडे नायजेरियापेक्षा जड वाटत आहे.
सामना क्र. ५३ फ्रान्स वि. नायजेरिया
स्थळ : इस्टाडिओ नॅशिओनल, ब्राझिलिया  ल्ल वेळ : रात्री ९.३० वा.पासून
लक्षवेधी खेळाडू
करिम बेन्झेमा (फ्रान्स) : तीन सामन्यांमध्ये तीन गोल करत करिम बेन्झेमाने आतापर्यंत फ्रान्ससाठी लक्षणीय कामगिरी केली आहे. बेन्झेमाच्या खेळात वेग आणि चपळता आहे. त्याचबरोबर चांगला अनुभवही गाठीशी आहे. त्याने फ्रान्स आणि रिअल माद्रिद संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे फ्रँक रिबरीच्या अनुपस्थितीत तो फ्रान्ससाठी हुकमाचा एक्का असेल.
अहमद मुसा (नायजेरिया) : २१व्या वर्षीच नायजेरियाचा सर्वोत्तम आक्रमणपटू होण्याचा मान पटकावला आहे तो अहमद मुसाने. आतापर्यंत रशियामधून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली आहे. विश्वचषकामध्येही त्याचे दोन गोल पंचांनी दिले नाहीत, पण अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात मात्र दोन गोल लगावत त्याने साऱ्यांचीच मने जिंकली.
गोलपोस्ट
साखळी फेरीमध्ये आमच्याकडून चांगली कामगिरी झाली असली तरी आता बाद फेरीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सावधपणे खेळ करावा लागेल. संघामध्ये चांगली गुणवत्ता आहे आणि सातत्याने आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. त्यामुळे नायजेरियाविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
– लाऊरेंट कोस्किइल्नी, फ्रान्स
अर्जेटिनाच्या सामन्यामधून आम्ही बरेच काही शिकलो आहोत. त्यामुळे फ्रान्सविरुद्धच्या सामन्यामध्ये आम्हाला बचावावर अधिक भर द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर आक्रमण करताना गोलसाठी अथक प्रयत्न करावे लागतील. आता बाद फेरीमध्ये धक्कादायक निकाल लागू शकतो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
अहमद मुसा, नायजेरिया