गतविजेत्या स्पेनचे परतीचे तिकीट निघाले आहे.. या पंक्तीमध्ये आणखी एक माजी विश्वविजेत्या संघाची भर पडणार आहे.. कारण फुटबॉलची परंपरा असलेले आणि विश्वचषकावर आपले नाव कोरून गुणवत्ता सिद्ध करणारे इटली व उरुग्वे हे दोन्ही संघ मंगळवारी एकमेकांसमोर उभे ठाकतील ते बाद फेरीत पोहोचण्याच्या ईर्षेनेच.. दोन्ही संघांना कोस्टा रिकाकडून पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन्ही संघांनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दोन्ही संघाने समान ३ गुण असले तरी गोलफरकातील फरक पाहिल्यास इटली उरुग्वेपेक्षा वरचढ आहे. त्यामुळे इटलीने हा सामना बरोबरीत सोडवला तरी त्यांना बाद फेरीत पोहोचता येऊ शकते, तर दुसरीकडे उरुग्वेला हा सामना जिंकण्यापासून गत्यंतर नाही. कारण त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल.
इटलीने पहिल्या सामन्यात इंग्लंडवर २-१ असा विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात कोस्टा रिकाकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला आहे. तर उरुग्वेला पहिल्या सामन्यात १-३ असा कोस्टा रिकाकडून पराभव पत्करावा लागला असून दुसऱ्या सामन्यात त्यांनी इंग्लंडवर २-१ असा विजय मिळवला आहे.
आतापर्यंत दोन्ही संघांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. उरुग्वेच्या संघात लुइस सुआरेझने परतल्यावर दोन गोल लगावले असू तो दमदार फॉर्मात आहे. त्यामुळे या सामन्यात सुआरेझ आणि इटलीचा गोलरक्षक गिआनलुगी बफन यांच्यामध्ये द्वंद्व पाहायला मिळेल.
दोन्ही संघ तुल्यबळ असून विजयासाठी आसूसलेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे पारडे समान असून मंगळवारी कोणता संघ बाजी मारत बाद फेरीत पोहोचतो, यावर फुटबॉल विश्वाचे कटाक्षाने लक्ष असेल.
सामना क्र. ३९
‘ड’ गट : इटली वि. उरुग्वे
स्थळ : इस्टाडिओ डा डुनास, नाताल
* वेळ : रात्री. ९.३० वा.

लक्षवेधी खेळाडू
लुइस सुआरेझ (उरुग्वे) : पहिला सामना दुखापतीमुळे खेळता आला नसला तरी दुसऱ्या सामन्यात दोन गोल करीत लुइस सुआरेझने संघाला जिंकवून दिले होते. सुआरेझ हा संघाचा हुकमी एक्का आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून चांगल्या फॉर्मातही आल्याने उरुग्वेसाठी आनंदाची गोष्ट असेल. उरुग्वेसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून या सामन्यात सुआरेझची जादू चालणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.

मारिओ बालोटेली (इटली) : इटलीचा अव्वल आक्रमणपटू म्हणजे मारिओ बालोटेली. आतापर्यंत बालोटेलीने एक गोल लगावला असला तरी त्याला संघाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. पण बालोटेली शांत बसणारा खेळाडू नक्कीच नाही. नेहमीच ईर्षेने पेटून उठणारा बालोटेली उरुग्वेविरुद्धच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करून संघाला विजय मिळवून देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गोलपोस्ट
सराव करताना आम्हाला इथले वातावरण आणि त्याचा होणारा त्रास जाणवला. आतापर्यंत स्पर्धेमध्ये युरोपीय संघ वातावरणापुढे हतबल होताना दिसले आहेत, पण आम्ही व्यावसायिक फुटबॉलपटू असल्याने अशी कोणतीही कारणे देणार नाही. उरुग्वेचा सामना करायला आम्ही सज्ज असून बाद फेरीत पोहोचण्याचा आमचा निर्धार आहे.
– गिआनलुगी बफन, इटली

आतापर्यंत विश्वचषकामध्ये आम्हाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नसला तरी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये आम्हाला सूर गवसला आहे. त्या विजयाने संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले असून त्याचा फायदा इटलीविरुद्धच्या सामन्यात आम्हाला होईल. इटलीवर विजय मिळवून बाद फेरीत पोहोचण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
ऑस्कर ताबारेझ, उरुग्वे

व्यूहरचना
आमनेसामने
सामने : २, इटली : विजय १, बरोबरी : १