फुटबॉलचा कैफ आता चढायला सुरुवात झाली आहे. ब्राझील आणि चिली हा बाद फेरीतील पहिलाच सामना उत्कंठावर्धक झाला, अतिरिक्त वेळही वाया गेला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये अखेर ब्राझीलने बाजी मारली आणि फुटबॉल विश्वाने सुस्कारा सोडला. या सामन्याची रंगत, लज्जत काही औरच होती, कारण प्रत्येक क्षण सामन्याला कलाटणी देईल, असे वाटत होते. यापूर्वीही असेच काही सामने झाले. पण त्यांची रंगत कोमेजून गेली ती रेफ्रींच्या काही सदोष निर्णयांमुळे. क्रीडा विश्वातील सर्वोच्च स्पर्धा म्हणजे विश्वचषक. चार वर्षांपासून प्रत्येक संघ आणि खेळाडू विश्वचषकाची वाट पाहत असतात आणि या महत्त्वाच्या सामन्यांमध्येच जर असे प्रकार रेफ्रींकडूनच घडले तर दाद मागायची कोणाकडे, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडेही नाही.
ब्राझील आणि क्रोएशिया या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापासूनच रेफ्रींच्या चुकांना सुरुवात झाली. या सामन्यामध्ये जपानच्या युईची निशिमुरा यांची मैदानावरील रेफ्री म्हणून नियुक्ती केली गेली आणि त्यांच्याकडून झालेल्या चुकीवर कडाडून टीका झाली. सामन्याच्या ७१व्या मिनिटाला क्रोएशियाच्या गोलजाळ्याजवळ त्यांचा बचावपटू देजान लोव्हरेनचा ब्राझीलच्या फ्रेडला हात लागला. त्या वेळी फ्रेड स्वत:हून खाली पडला आणि रेफ्रींनी ब्राझीलला पेनल्टी बहाल केली. नेयमारने या संधीचा फायदा उचलत गोल केला. या निर्णयावर सर्वत्र जोरदार टीका झाली. याच सामन्याच्या २६व्या मिनिटाला नेयमारने जाणूनबुजून क्रोएशियाचा मधल्या फळीतील खेळाडू लुका मॉड्रिकला कोपर मारून त्याला खाली पाडले. या वेळी रेफ्रींनी नेयमारला पिवळे कार्ड दिले, पण जर खेळाडू असे प्रकार करत असेल तर कोणता खेळाडू आहे हे न बघता त्याला लाल कार्ड द्यायला हवे होते, अशी टीका या वेळी झाली. या सामन्यात रेफ्रींना इंग्रजी भाषा येत नसल्याची टीका क्रोएशियाचा बचावपटू वेड्रान कोरलुकाने केली. निशिमुरा हे जपानी भाषेत बोलत असल्याने आम्हाला काहीच कळत नव्हते. एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत रेफ्रींना इंग्रजी येऊ नये, याला काय म्हणणार, असे कोरलुका म्हणाला.
‘अ’ गटातील मेक्सिको आणि कॅमेरून यांच्यातील सामन्यामध्ये मेक्सिकोचा मधल्या फळीतील खेळाडू गिओव्हानी दोस सांतोसने दोन गोल लगावले खरे, पण दोन्ही गोलच्या वेळी पंचांनी ‘ऑफ साइड’ असल्याचे जाहीर केले, पण त्यानंतर पाहण्यात आलेल्या रिप्लेमध्ये सांतोस हा कॅमेरूनच्या खेळाडूंच्या पुढे दोन्ही वेळी नव्हता.
जर्मनी आणि पोर्तुगाल हा साखळीतील अव्वल दर्जाचा सामना होता, पण जर्मनीने पोर्तुगालची वाताहत केली. या सामन्याच्या ३७व्या मिनिटाला पेपेला लाल कार्ड देण्यात आले. त्यापूर्वी पेपे आणि जर्मनीचा थॉमस म्युलर हे तडफेने खेळत होते आणि खेळताना पेपेचे डोके म्युलरला लागले. म्युलर खाली पडला आणि त्याने जो काही हंबरडा फोडण्याचा प्रयत्न केला ते पाहून पेपे आणखीनच वैतागला, कारण म्युलरला कोणतीही दुखापत झाली नव्हती, पण त्याने ते तसे अवसान आणले आणि पेपेला लाल कार्ड मिळाले. या सामन्याच्या तीन दिवसांपूर्वीच स्पेन आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यामध्ये अशीच घडना घडली होती. स्पेनच्या दिएगो कोस्टाने नेदरलँड्सच्या ब्रुनो मार्टिन्सला असेच डोक्याने मारले होते, पण त्या वेळी तिथे एकही रेफ्री नव्हता आणि कोणतीही कारवाई त्या वेळी झाली नाही. जर्मनी आणि पोर्तुगाल सामन्यामध्ये रेफ्रींनी जशी जर्मनीला पेनल्टी दिली तशीच परिस्थिती सामन्याच्या ७५व्या मिनिटालाही उद्भवली होती, पण रेफ्रींनी पोर्तुगालला मात्र पेनल्टी दिली नाही.
अर्जेटिना आणि इराण यांच्यातील सामन्यामध्ये रेफ्री मिलोराड माझिक यांच्याकडूनही एक चूक झाली. या सामन्यात माझिक यांनी इराणला पेनल्टी देण्याकडे कानाडोळा केला. ती पेनल्टी मिळाली असती तर साखळी फेरीत अजून एक धक्का बसू शकला असता. नायजेरियाविरुद्धच्या सामन्यामध्ये सदोष पंचगिरीचा फटका बोस्निया आणि हझ्रेगोव्हिना यांना बसला. न्यूझीलंडचे रेफ्री पीटर आ’लिअरी यांनी बोस्नियाने केलेला गोल रद्द ठरवत ‘ऑफ साइड’ दिला; पण रिप्लेमध्ये बोस्नियाकडून अशी कोणतीच चूक झाल्याचे दिसले नाही.
यंदाच्या विश्वचषकात सर्वात जास्त गाजलेले प्रकरण म्हणजे लुइस सुआरेझचे. एक नावलौकिक मिळवलेला खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूचा मैदानात चावा कसा घेऊ शकतो, हेच मुळात अनाकलनीय. सामन्याच्या ७५व्या मिनिटाला सुआरेझ इटलीचा बचावपटू जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर चावला, पण सुआरेझवर मैदानातील रेफ्रींनी कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेनंतर चिएलिनी स्वत:हून चाव्याचे व्रण दाखवायला मेक्सिकोचे रेफ्री मार्को रॉड्रिगेझ यांच्याकडे गेला, पण त्यांनी या घटनेची कोणतीच दखल घेतली नाही. सामन्यानंतर सुआरेझवर फिफाने कारवाई केली, पण जेव्हा मैदानावर ही घटना घडली तेव्हा रेफ्रींनी काय कारवाई केली, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही.
आतापर्यंतच्या विश्वचषकात रेफ्रींकडून वारेमाप चुका पाहायला मिळाल्या आणि फिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांना यामध्ये लक्ष घालावे लागले. त्यांनीही घडलेले सारे प्रकार पाहिले आणि संघांचे प्रशिक्षक रेफ्रींच्या विरोधात दाद मागू शकतात, असा निर्णय घेतला.
मैदानात होणाऱ्या खेळाडूंच्या चुकांवर लक्ष ठेवायला रेफ्रींना नेमलेले असते, पण जिथे रेफ्रीच चुका करतात तिथे दाद कुणाकडे मागायची? आतापर्यंत रेफ्रींनी बऱ्याचदा काही गोष्टींकडे साफ दुर्लक्ष केले आहे, तर बऱ्याच निर्णयांमध्ये त्यांनी पक्षपात केल्याचेही जाणवले. मोठय़ा खेळाडूंच्या चुकांकडे काही वेळा रेफ्रींनी सोयीस्कररित्या कानाडोळा केला, तर काहींना कमी स्वरूपाची शिक्षा केली. रेफ्रींकडूनही चुका होऊ शकतात, परंतु विश्वचषकाची लज्जत आणि रंगत लुटता यावी यासाठी रेफ्रींनी आपले कार्य तत्परतेने करण्याची आवश्यकता आहे.