फिफा विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने ४-२ अशा फरकाने क्रोएशियाला पराभूत केले आणि जगज्जतेपद पटकावले. हे फ्रान्सचे तिसरे विश्वचषक विजेतेपद ठरले. या आधी १९३८ आणि १९९८ साली फ्रान्सने ही स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत ‘फेअर-प्ले’ पुरस्कार स्पेनला देण्यात आला. या पुरस्कारावरून अनेकांना २००३ साली झालेल्या इराण आणि डेन्मार्क यांच्यातील सामन्याची आठवण झाली. अनेकांनी पुढील दोन दिवस या संबंधीचा व्हिडीओ आणि ती कथा सोशल मीडियावर पोस्ट केली. तर काहींनी ती व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचवली. त्यामुळे सध्या तो व्हिडीओ आणि ती कथा प्रचंड व्हायरल झाली आहे.

काय होते प्रकरण

२००३ साली एका सामन्यात इराण आणि डेन्मार्कचे खेळाडू खेळत होते. त्यावेळी हाफटाइम होण्याच्या काही सेकंद आधी मैदानात शिट्टीचा आवाज झाला. ही शिट्टी रेफरीने वाजली असल्याचे समजून इराणच्या खेळाडूने फुटबॉल हातात घेतला आणि तो डगआउटच्या दिशेनं चालू आहे. मात्र ही शिट्टी रेफरीने वाजली नव्हती, तर स्टेडियममध्ये बसलेल्या एका प्रेक्षकाने वाजवली होती. त्यामुळे तो इराणचा फाऊल धरण्यात आला. त्याहून महत्वाचे म्हणजे ज्यावेळी त्याने चेंडू उचलला, तेव्हा तो पेनल्टी क्षेत्रात होता. त्यामुळे डेन्मार्कला पेनल्टी किकची संधी मिळाली. या प्रकाराबाबत मैदानावर चर्चा झाली. त्यानंतर डेन्मार्कचा खेळाडू मॉर्टन वेघोर्स्ट याने आपल्या प्रशिक्षकाशी चर्चा केली आणि मुद्दाम गोल केला नाही.

पहा व्हिडिओ –

मॉर्टन वेघोर्स्ट याच्या खिलाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. हा सामना डेन्मार्क १-० अशा फरकाने हारला. पण या सामन्यात मॉर्टन वेघोर्स्ट याची सर्वाधिक चर्चा झाली. त्याने गोल मुद्दाम हुकवल्यानंतर संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून आणि टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. त्यावर्षी डेन्मार्ककडून त्याला ‘सर्वोकृष्ट डॅनिश खेळाडू’चा पुरस्कार देण्यात आला. तर २००३च्या ऑलिम्पिक समितीचा फेअर प्ले पुरस्कारही त्याला प्रदान करण्यात आला.