News Flash

भारताच्या सामन्यांसाठी नवी मुंबईचा ‘पत्ता कट’?

क्रीडा मंत्रालयाच्या दडपणामुळे सामने नवी दिल्लीत होण्याची चिन्हे

| June 29, 2017 03:15 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

क्रीडा मंत्रालयाच्या दडपणामुळे सामने नवी दिल्लीत होण्याची चिन्हे

केंद्र सरकारच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करीत ‘फिफा’ने १७ वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील भारताचे सामने मुंबईहून दिल्लीकडे हलवले जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

यजमान भारताचे सामने मुंबईत व्हावे, अशी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची (एआयएफएफ) आधी इच्छा होती. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून दडपण आल्यानंतर हे सामने मुंबईऐवजी दिल्लीत खेळवण्यात यावे, अशी विनंती संघटनेने केली.

राऊंड रॉबिन लीगमधील भारताचे सामने दिल्लीत खेळवण्याचे निश्चित झाले का, असे विचारले असता फिफाच्या स्पर्धा समितीचे प्रमुख जेमी यार्झा म्हणाले, ‘‘फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पध्रेच्या संयोजनात भारत सरकारचे महत्त्वपूर्ण योगदान आम्हाला लाभत आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा गांभीर्याने विचार केला आहे. स्पध्रेच्या दृष्टीने सर्वोत्तम अशा निर्णयाबाबत चर्चा सुरू आहे.’’ यजमान म्हणून भारताचा ‘अ’ गटात समावेश असेल. तसेच चार गटांमध्ये संघांची विभागणी करताना ‘अ-१’ या स्थानावर भारत असेल. याआधी ‘अ’ गटातील साखळी सामने नवी मुंबईत होणार होते. मात्र भारतीय फुटबॉल महासंघाच्या निर्देशामुळे आता भारताचे सामने दिल्लीत, तर ‘ब’ गटातील सामने नवी मुंबईत होतील. सामन्यांचे हे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘‘एआयएफएफ आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेच्या संयोजनामुळे देशातील फुटबॉलचे भवितव्य बदलू शकते. त्यामुळेच सर्वाचे समाधान होईल, असा निर्णय आम्ही घेऊ,’’ असे यार्झा यांनी सांगितले. भारतात फिफाची पहिलीच जागतिक स्पर्धा होत असून, ती ६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत सहा शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहे.

‘‘मुंबईत ७ जुलैला स्पध्रेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. या वेळी दोन दिग्गज फुटबॉलपटू येणार आहे,’’ असे संकेत यार्झा यांनी या वेळी दिले.

तिकीट विक्रीबाबत यार्झा म्हणाले, ‘‘गुवाहाटी, कोची, दिल्ली येथील तिकीटविक्रमी समाधानकारक आहे. भविष्यातील ताऱ्यांचा खेळ पाहण्याची संधी भारतीय चाहते गमावणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. नवी मुंबई, नवी दिल्ली आणि गोव्यातील तिकीट विक्रीत वेग घेण्याची आवश्यकता आहे. स्पध्रेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तिकिटांची मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या तरी एकंदर प्रतिसादाबद्दल फिफा समाधानी आहे.’’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 3:15 am

Web Title: fifa world cup dy patil stadium marathi articles
Next Stories
1 प्रो-कबड्डीचा थरार २८ जुलैपासून, सलामीलाच मुंबई-पुण्याचे संघ भिडणार
2 मयंती लँगरच्या व्हिएतनाम ट्रिपचे खास फोटो
3 ‘डेहराडून गर्ल’ भूमिका शर्मा ‘मिस वर्ल्ड’