स्वित्र्झलंडविरुद्धच्या सामन्यात गोल होत नव्हता म्हणून चिंताग्रस्त झालो होतो असे मत अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने व्यक्त केले आहे. बाद फेरीत स्वित्र्झलंडविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाला सामन्याच्या निर्धारितवेळेत गोल करता आला नव्हता. अतिरिक्त वेळही संपण्याच्या दोन मिनिटांच्या आधी डी मारियाने केलेल्या गोलच्या बळावर अर्जेंटिना विजयी झाली.
हा सामना आम्हाला ९० मिनिटांमध्येच संपवता आला पाहिजे होता असे अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकांनी म्हटले होते. आता मेस्सीनेही सामन्यात अर्जेंटिनाकडून गोल होत नव्हता म्हणून दडपण आले होते असे म्हटले तसेच सामन्यात स्वित्र्झलंडच्या उत्तम बचावी फळीचे कौतुकही केले. मेस्सी म्हणाला की, स्वित्र्झलंडचा संघ सामन्यात आमच्या आक्रमणाचा उत्तम बचाव करत होता. त्यामुळे गोल होत नव्हता आणि माझ्यावर दडपण आले होते. सामन्यातील एख छोटीशी चूक आम्हाला विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखविण्यास पुरेशी होती. यातून आम्हाला अशा प्रसंगांनाही सामोरे जावे लागू शकते याची जाणीव झाली आहे. असेही मेस्सी म्हणाला.