फुटबॉलचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱया ब्राझीलमध्ये मोठ्या जल्लोषात फिफा विश्वचषकाला सुरूवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यजमान ब्राझील संघाने क्रोएशियावर  ३-१ अशी मात करत विजयी सुरूवात केली आहे.
ब्राझीलचा युवा खेळाडू नेयमारने अपेक्षित कामगिरी करत सामन्यात दोन गोल नोंदविले तर, ऑस्करनेही सामन्याच्या अखेरच्या मिनिटात गोल करून आम्हीच इथले ‘बब्बर शेर’ असल्याचे सिद्ध केले आणि ब्राझीलच्या शानदार विजयाची नोंद झाली.
सामन्याच्या सुरुवातीला अगदी अकराव्या मिनिटातच मार्सेलोने झणझणीत गोल करत ब्राझील संघाला धक्का दिला. परंतु, त्यानंतर उत्तम सांघिक कामगिरी करत ब्राझीलच्या नेयमारने सामन्याच्या २९ व्या मिनिटाला आपल्या कसबदार शैलीने गोल नोंदविला आणि ब्राझील संघाचे खाते उघडून दिले.
त्यानंतर दोन्ही संघ एकमेकांना दमदार टक्कर देत होते. मध्यांतरानंतर पेनल्टी किकच्या माध्यमातून ब्राझील संघाला आघाडी मिळविण्याची संधी चालून आली. नेयमारने हाती आलेली संधी न गमावता गोल नोंदविला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. क्रोएशिया संघही त्यानंतर तडफदार प्रत्युत्तर देताना दिसला. अखेरच्या मिनिटापर्यंत क्रोएशिया संघ ब्राझीलला तुल्यबळ टक्कर देत होता. त्यानंतर अखेरच्या मिनिटात ब्राझीलचा २२ वर्षीय खेळाडू ऑस्करने आक्रमक गोल नोंदविला आणि ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
*सामनावीर- नेयमार (ब्राझील) २ गोल