यंदाच्या विश्वचषकामध्ये वेन रुनीच्या इंग्लंडच्या संघाला संभाव्य दावेदार म्हटले गेले होते, पण इटली आणि उरुग्वेने त्यांना पराभूत करत परतीचे तिकीट हातात ठेवले आहे. आता अखेरच्या सामना ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असून त्यांचा सामना गटामध्ये अपराजित राहिलेल्या कोस्टा रिकाबरोबर होणार आहे. सध्याचा फॉर्म पाहता इंग्लंडचा संघ कागदावर बलवान दिसत असला तरी त्यांना मैदानात काहीच करता आलेले नाही, तर दुसरीकडे कोस्टा रिकाने माजी विश्वविजेत्यांना धूळ चारली आहे. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडपेक्षा कोस्टा रिकाचेच पारडे जड दिसत आहे.
इंग्लंडची रणनीती रुनीभोवती गुंफलेली होती, रुनीने प्रयत्न केले खरे, पण त्याला दैवाने साथ दिली नाही. संघातील अन्य खेळाडूंनाही पराभव टाळणे जमले नसल्याने त्यांच्यावर ही
परिस्थिती ओढवली आहे. कोस्टा रिकाचा संघ या विश्वचषकात ‘जायंट किलर’ ठरला आहे. कोस्टा रिका इंग्लंडला पराभूत करत साखळी गटामध्ये अपराजित राहणार की इंग्लंड स्पर्धेचा शेवट
गोड करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सामना क्र. ४०
‘ड’ गट : इंग्लंड वि. कोस्टा रिका
स्थळ :  इस्टाडिओ मिनेइराओ, बेलो होरिझोंटे
वेळ :  रात्री ९.३० वा. पासून