फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी

अतिरिक्त वेळेत सेईमिनलेन डोंगेल याने केलेल्या महत्त्वपूर्ण गोलमुळे भारताने फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध पराभव टाळला. डोंगेलच्या गोलमुळे भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवत तिसऱ्या फेरीत मजल मारण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

भारतीय संघाची दुसऱ्या पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना अखेरच्या क्षणी (९०+३) बदली खेळाडू सेईमिनलेन याने भारतासाठी हेडरद्वारे गोल लगावला. अफगाणिस्तानने झेल्फगर नझारीच्या गोलमुळे ४५व्या मिनिटालाच आघाडी घेतली होती. भारताने ई गटात चार सामन्यांत तीन गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. अफगाणिस्तान चार गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. या गटातून अव्वल दोन संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहे. २०२२ फिफा विश्वचषकाचे आयोजन कतार करणार असल्यामुळे त्यांना थेट प्रवेश मिळाला आहे. कतार १० गुणांसह अव्वल स्थानी असल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरील संघाला तिसरी फेरी गाठण्याची संधी आहे.

सेंट्रल रिपब्लिकन स्टेडियमवर अतिशय थंड वातावरणात झालेल्या या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. तापमान ९ अंश सेल्सियस इतके असतानाही भारताने कडवा प्रतिकार केला. पण ४५व्या मिनिटाला अफगाणिस्तानने गोलचे खाते उघडले. डेव्हिड नजेमने चेंडूवर नियंत्रण मिळवत आगेकूच केली. मध्यभागी मजल मारल्यानंतर त्याने चेंडू झेल्फगरकडे सोपवला. झेल्फगरने भारतीय बचावपटूंची फळी भेदून चेंडू गोलजाळ्यात धाडला.

१४९व्या क्रमांकावरील अफगाणिस्तानचा आत्मविश्वास या गोलमुळे उंचावला. आघाडीवीर अहमद ओमरान आणि फैसल शायेस्तेह यांनी भारतीय बचावपटूंवर दडपण आणले. पण मंदार राव देसाई, आदिल खान, राहुल भेके आणि प्रीतम कोटल यांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. भारत बरोबरी राखण्यासाठी उत्सुक असताना ५८व्या मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीने मारलेला फटका अफगाणिस्तानचा गोलरक्षक अझिझीने अडवला. मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी भारतीय संघात अनेक बदल करत ब्रँडन फर्नाडेस, प्रोणय हल्देर यांना संधी दिली. अखेरीस सेईमिनलेनचा गोल भारतासाठी निर्णायक ठरला.

भारत

सेईमिनलेन डोंगेल ९०+३’

अफगाणिस्तान

झेल्फगर नझारी

४५+१’

भारताचा सेईमिनलेन डोंगेल गोल करण्याच्या प्रयत्नांत