दोहा येथे सुरू असलेल्या FIFA World Cup qualifier स्पर्धेत सलामीच्या लढतीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारताने बलाढ्य कतारचे आव्हान मात्र बरोबरीत परतवले. जागतिक क्रमवारीत ६२व्या क्रमांकावर असलेला आशियाई विजेता असलेला संघ भारताला मात देईल, अशी शंका व्यक्त केली जात होता. सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानवर ६-० असा विजय मिळवल्यामुळे भारताविरुद्धही कतारचेच पारडे जड मानले जात होते.

१०३व्या क्रमांकावरील भारताशी मंगळवारी झाला. पण भारताने त्यांचे आव्हान दमदार खेळी करून परतावून लावले. सामन्यात कायम आक्रमक खेळी करणाऱ्या कतारला भारताने एकदाही गोल करू दिला नाही आणि सामना गोलशून्य बरोबरीत सोडवला. त्यामुळे भारताच्या विश्वचषकाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने उपस्थित प्रेक्षकांचे हात वर करून आणि टाळ्या वाजवून अभिवादन केले. त्यावेळी भारतीय संघासाठी स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

या आधीच्या सामन्यांमध्ये कतारने भारतावर वर्चस्व गाजवले होते. चार पैकी तीन अधिकृत लढती कतारने जिंकल्या होत्या, तर एक लढत बरोबरीत सुटली होती. या दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या लढतीत कतारने भारताचा ६-० असा धुव्वा उडवला होता. तर विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत ओमानविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने भारताला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली होती; पण अखेरच्या ८ मिनिटांत दोन गोल स्वीकारल्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, २०२२ मध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या कतारने गेल्या काही वर्षांत आपल्या खेळात कमालीची सुधारणा घडवून आणली आहे. यावर्षी संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या आशियाई चषकाचे विजेतेपद त्यांनी पटकावले. निमंत्रित म्हणून दाखल झालेल्या कतारने कोपा अमेरिका स्पर्धेत दक्षिण आशियाई संघांनाही कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे भारताचा त्यांचा निभाव लागेल की नाही याबाबत चाहत्यांच्या मनात साशंकता होती. पण भारतानेही गेल्या काही दिवसात आपली कामगिरी उंचावली असून आशियाई स्पर्धेत संयुक्त अरब अमिराती आणि बहारिनसारख्या संघांना चांगली लढत दिली होती. मात्र भारताची बाद फेरी थोड्या फरकाने हुकली होती.