दोहा : सलामीच्या लढतीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत आगेकूच करण्याच्या भारताच्या आशांना धक्का पोहोचला आहे. आता दुसऱ्या फेरीत भारतासमोर आशियाई विजेत्या कतारचे आव्हान असणार आहे.

ओमानविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने भारताला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली होती; पण अखेरच्या ८ मिनिटांत दोन गोल स्वीकारल्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत ६२व्या क्रमांकावर असलेल्या कतारचा ई गटातील दुसरा सामना १०३व्या क्रमांकावरील भारताशी होणार आहे. सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानवर ६-० असा विजय मिळवल्यामुळे भारताविरुद्धही कतारचेच पारडे जड मानले जात आहे.

२०२२ मध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या कतारने गेल्या काही वर्षांत आपल्या खेळात कमालीची सुधारणा घडवून आणली आहे. यावर्षी संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या आशियाई चषकाचे विजेतेपद त्यांनी पटकावले. निमंत्रित म्हणून दाखल झालेल्या कतारने कोपा अमेरिका स्पर्धेत दक्षिण आशियाई संघांनाही कडवी टक्कर दिली होती.

भारतानेही आपली कामगिरी उंचावली असून आशियाई स्पर्धेत संयुक्त अरब अमिराती आणि बहारिनसारख्या संघांना चांगली लढत दिली होती. मात्र भारताची बाद फेरी थोडय़ा फरकाने हुकली होती. कतारने भारतावर वर्चस्व गाजवले असून चारपैकी तीन अधिकृत लढती जिंकल्या आहेत. एक लढत बरोबरीत सुटली आहे. गेल्या सामन्यात कतारने भारताचा ६-० असा धुव्वा उडवला होता.