X

नायजरचे आक्रमण थोपवणे कोरियासाठी आव्हानात्मक

नायजर संघाने पात्रता फेरीत धक्कादायक विजय मिळवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.

नायजर संघाने पात्रता फेरीत धक्कादायक विजय मिळवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळेच कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील त्यांच्या पदार्पणाविषयी मोठी उत्सुकता आहे. शनिवारी ड-गटातील त्यांची सलामीची लढत बचावात्मक खेळासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरियाशी होणार आहे. त्यामुळेच नायजरचे आक्रमण थोपवण्यात कोरिया यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

‘फिफा’च्या कोणत्याही जागतिक स्पर्धेत नायजर संघ आतापर्यंत सहभागी झाला नव्हता. कुमारांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यू कॅलेडोनिया यांच्यासह पदार्पण करणारा तिसरा संघ म्हणजे नायजर. आफ्रिकन खंडाच्या पात्रता स्पर्धेत नायजरने चक्क माजी जगज्जेत्या नायजेरियाला हरवण्याची किमया साधली होती. अगदी उपांत्य फेरीच्या सामन्यातही नायजरने बलाढय़ घानाला तगडी टक्कर दिली होती. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये घानाने ६-५ असा विजय मिळवला होता. मग तिसऱ्या स्थानाच्या लढतीत गिनीने नायजरला ३-१ असे हरवले होते.

ड  गट : नायजर वि. उत्तर कोरिया

स्थळ : जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कोची

जर्मनीची सलामी आज कोस्टा रिकाशी

मडगाव : जर्मनीचा संघ कुमारांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत १० वेळा सहभागी झाला आहे. मात्र जगज्जेतेपदाला गवसणी घालणे, या संघाला एकदाही जमलेले नाही. मात्र यंदा विजेतेपदाच्या निर्धाराने सहभागी झालेला जर्मनीचा संघ शनिवारी सलामीच्या सामन्यात कोस्टा रिकाशी भिडणार आहे.

वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जर्मनीचा संघ गोव्यात आधीच दाखल झाला आहे. आता मानसिक लढाई जिंकण्याच्या ईष्रेने गेले चार दिवस हा संघ योगा करीत आहे.

‘‘आम्ही प्रत्येक वेळी एका सामन्याचा विचार करतो. त्यामुळे कोस्टा रिका, इराण आणि गिनीविरुद्धचे सामने जिंकल्यानंतर बाद फेरी गाठणे, हे आमचे पहिले लक्ष्य आहे,’’ असे जर्मनीचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस्टियन वूक यांनी सांगितले.

गोव्यात सर्वात शेवटी दाखल झालेला संघ म्हणजे कोस्टा रिका. गेले दोन दिवस विविध मैदानांवर या संघाने सराव केला. कोस्टा रिका यंदा दहाव्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. २००१ ते २००७ या सुवर्णकाळातील प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत हा संघ बाद फेरीत पोहोचला होता.

क गट : जर्मनी वि. कोस्टा रिका

स्थळ : पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, गोवा

ब्राझील-स्पेन लढतीकडे सर्वाचे लक्ष

कोची : वरिष्ठांच्या फुटबॉल व्यासपीठावर ब्राझील आणि स्पेनच्या लढतीकडे औत्सुक्याने पाहिले जाते, तीच उत्कंठा कुमारांच्या सामन्याबाबतही आहे. तीन वेळा जगज्जेत्या ब्राझीलची शनिवारी कुमार विश्वचषकात सलामीची लढत युरोपियन महासत्ता म्हणून बिरुद मिरवणाऱ्या स्पेनशी होणार आहे.

कोचीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दक्षिण अमेरिकन विजेता ब्राझील आणि युरोपियन पात्रता विजेता स्पेन यांच्यातील लढतीची पर्वणी अनुभवता येणार आहे. त्यामुळेच या स्टेडियमचे वातावरण जणू रिओ दी जानिरो किंवा साऊ पावलोप्रमाणे असू शकेल. मात्र ‘फिफा’ने स्थानिक संयोजकांवर बंधने घालून स्टेडियमची मर्यादा २९,२००पर्यंत मर्यादित ठेवली आहे.

ब्राझीलचा संघ आक्रमक खेळासाठी ओळखला जातो, तर स्पेन फुटबॉलवर ताबा ठेवण्याच्या ‘टिकी-टाका’ शैलीसाठी विशेष ओळखला जातो. त्यामुळे या लढतीत जो संघ जिंकेल, तो बाद फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकेल.

ड गट : ब्राझील वि. स्पेन

स्थळ : जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कोची

इराणपुढे गिनीचा निभाव लागणार का?

मडगाव : इराणचा संघ जागतिक फुटबॉलच्या नकाशावर ‘आशियाई महाशक्ती’ म्हणून ओळखला जातो. कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत क-गटात समावेश असलेल्या इराणच्या अभियानाला शनिवारी गिनीविरुद्धच्या सामन्याने प्रारंभ होणार आहे.

इराणचा संघ चौथ्यांदा कुमार विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला आहे. इतकेच नव्हे, तर मागील दोन विश्वचषक स्पर्धेत या संघाने उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. मात्र एकदाही हा संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला नाही. भारतात गतवर्षी हा संघ १६ वर्षांखालील वयोगटाची आशियाई फुटबॉल स्पर्धा खेळला आहे. त्यावेळी इराकला विजेतेपद, तर इराणला उपविजेतेपद मिळाले होते. गोव्यात खेळण्याचा अनुभव गाठीशी असल्याचा फायदा आम्हाला होईल, असे इराणचे प्रशिक्षक अब्बास चमनयान यांनी सांगितले.

गिनीच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळेच आश्चर्यकारक विजयासह हा संघ उदयास येऊ शकतो.

क गट

इराण वि. गिनी

स्थळ : पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, गोवा

  • Tags: FIFA World Cup U17 2017, Football Fifa U17 World Cup,
  • Outbrain