मॉस्को : फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यादरम्यान झालेल्या अंतिम सामन्याच्या उत्तरार्धात मैदानात धावून गेलेल्या ‘पुसी रायट’ नामक संस्थेच्या चार आंदोलकांना १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही क्रीडा सोहळ्यात सहभागी होण्यास तीन वर्षांची बंदीदेखील घालण्यात आली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंडा ग्रॅबर कितारोविच यांच्या उपस्थितीत लुझिनिकी स्टेडियमवर रविवारी हा सामना झाला होता. त्या सामन्यात अचानकपणे मैदानात धावून गेल्याने सामना काही क्षण थांबवावा लागला होता.  त्यात तीन महिला आणि एक पुरुष असून त्यांची नावे व्हेरोनिका निकुलशिना, ओल्गा कुराचेव्हा, ओल्गा पाखतुसोवा अणि पीओत्र व्हेरझीलोव अशी आहेत. अवघ्या एक मिनिटात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी या महिलांना ताब्यात घेत सामना सुरळीत सुरू केला होता. मात्र, हे काही क्षणांचे नाटय़ नक्की काय होते? आणि ही हुल्लडबाजी कोणत्या कारणाने करण्यात आली, त्याचा उलगडा होऊ शकला नव्हता. परंतु, त्यानंतर अवघ्या काही क्षणातच पुस्सी रायटच्या अन्य सदस्यांनी त्यांचे संदेश समाजमाध्यमांवर पाठवत त्यांच्या या कृत्याची कारणमीमांसा विशद केली होती. ‘सर्व राजकीय कैद्यांना मुक्त करा’ या मुख्य मागणीसह सहा मागण्या करण्यात आल्या होत्या. यापूर्वी याच संघटनेच्या महिला सदस्यांनी २०१२ साली मॉस्कोतील मध्यवर्ती चर्चमध्ये पुतिनविरोधी गाणे गाऊन त्याचा निषेध केला होता. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यावेळीदेखील या महिला संघटनेकडे आकर्षित झाले होते. त्यावेळी नादेझडा टोलोकोनिकोवा आणि मारिया अल्योखिना यांना दोन वर्षांची शिक्षा देऊन प्रत्यक्षात २२ महिन्यांच्या कारावासानंतर सोडून देण्यात आले होते.   असून रशियातील पुतिन सरकारच्या दडपशाहीविरोधासह लैंगिक समानता, न्यायालयीन, शैक्षणिक, सांस्कृतिक सुधारणा आणि अन्य मुद्दय़ांसाठी त्यांची संघटना सातत्याने चर्चेत राहणारे उपक्रम करून जगाचे लक्ष वेधत असते.