भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका

सलग दोन सामन्यांत ‘सुपर ओव्हर’मध्ये न्यूझीलंडला नमवण्याचा पराक्रम दाखवणारा अजिंक्य भारतीय संघ आता निभ्रेळ यशाकडे वाटचाल करीत आहे. रविवारी ट्वेन्टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात विजयाचा निर्धार भारताने केला आहे.

मायदेशातील तीन किंवा अधिक सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत सर्वच सामने न्यूझीलंडने आतापर्यंत कधीच गमावलेले नाहीत. २००८मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत त्यांनी ०-२ अशी हार पत्करली होती. त्यामुळे ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारीत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यापाठोपाठ पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताला क्रमवारी सुधारण्याची संधी आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ प्रयोगांना महत्त्व देत आहे. संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी या संधी गमावल्या आहेत. मनीष पांडेने चौथ्या सामन्यात हिमतीने खेळत तळाच्या फलंदाजांसह भारताला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली आहे. मुंबईतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या दुखापतीपासून ऋषभ पंतला उपयोगात आणलेले नाही. देशातील प्रथमपसंतीचा यष्टिरक्षक ही ओळख त्याने आता गमावली आहे.

विराट, बुमराला विश्रांती

वेलिंग्टनच्या चौथ्या सामन्यात उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. आता पाचव्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देऊन रोहितकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येणार आहे. गोलंदाजीच्या विभागात मोहम्मद शमी खेळेल, तर जसप्रीत बुमराला विश्रांती दिली जाणार आहे.

विल्यम्सन खेळणार

खांद्याच्या दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात खेळू न शकलेला केन विल्यम्सन तंदुरुस्त झाला असून, तो रविवारी खेळण्याची शक्यता बळावली आहे. कचखाऊ वृत्तीमुळे विजयाने हुलकावणी दिल्यामुळे आत्मविश्वास उंचावण्याचे आव्हान न्यूझीलंड संघापुढे असेल.

भारताला दंड

वेस्टपॅक स्टेडियमवर झालेल्या चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात षटकांची गती धिमी राखल्याबद्दल भारतीय संघाच्या सामन्याच्या मानधनापैकी ४० टक्के रक्कम दंड ठोठावण्यात येणार आहे. अपेक्षित वेळेत भारताने दोन षटके कमी टाकल्याचा ठपका ठेवत ‘आयसीसी’चे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी ही कारवाई केली आहे.

संघ

* भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.

* न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिशेल, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, ईश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.

* वेळ : दुपारी १२.३० वाजल्यापासून

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १