दिल्लीकरांचे मतभेद कधीही लपले नाहीत. भर रस्त्यातही ते हमरातुमरीवर यायला कमी करत नाहीत. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन दिल्लीकर हमरातुमरीवर आले आणि आयपीएलच्या सहाव्या मोसमाला पहिल्यांदाच वादाची किनार लाभली. ते दोन दिल्लीकर होते विराट कोहली आणि गौतम गंभीर. दोन्ही अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्सचे कप्तान.
कोलकाताचे उद्दिष्ट गाठताना १०व्या षटकांत विराट कोहली ३५ धावांवर बाद झाल्यानंतर तंबूच्या दिशेने परतत होता. पण बंगळुरूच्या विजयाची पायाभरणी कोहलीने केल्यामुळे गंभीर रागाच्या भरात काही तरी बोलला. पण मान खाली घालून मैदानात निघून जाणारा तो संयमाचा महामेरू सचिन तेंडुलकर थोडीच होता. प्रतिस्पध्र्याला ‘ईट का जबाब पत्थर से’ देणारा कोहली मागे वळला. ‘क्या बोला, क्या बोला’ असे म्हणत तो गंभीरच्या अंगावर धावून आला. गंभीरही माघार घेणाऱ्यांपैकी नव्हता. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जाणार आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर आणखी एक दिल्लीकर रजत भाटिया मध्यस्थ म्हणून धावत आला. त्याने कोहलीला मैदानात पाठवले तर कोलकाताच्या अन्य क्षेत्ररक्षकांनी आणि मैदानावरील पंच अनिल चौधरी यांनी गंभीरला दुसऱ्या बाजूला ढकलले.
सध्या कोहली आणि गंभीरची कारकीर्द विरोधाभास अशीच आहे. गंभीरने भारताच्या कसोटी संघातील आपले स्थान गमावले असून कोहलीने गंभीरकडून उपकर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. गंभीरचे वाढते वय त्याच्या कामगिरीच्या आड येत असून फॉर्मात असलेल्या कोहलीकडे भारताचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. योगायोगाची बाब म्हणजे, दोघेही दिल्ली आणि ओएनजीसी संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गंभीरने वीरेंद्र सेहवागच्या साथीने भारताचा सलामीवीर म्हणून आपले स्थान निश्चित केले होते, त्यावेळी कोहलीने दिल्लीकडून पदार्पण केले होते.
सामना संपल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी एकमेकांशी औपचारिक हस्तांदोलन केले, पण या दोघांमधील ‘ठस्सन’ संपलेली नाही, असेच त्यावेळी जाणवत होते. मात्र ‘मैदानावरील भांडण मैदानावरच राहू द्या,’ असाच दोघांचा अविर्भाव होता.

कोहली, गंभीरला ताकीद
बंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यादरम्यान एकमेकांविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर यांना अधिकृत इशारा आणि ताकीद देण्यात आली आहे. कलम १ अन्वये आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांनाही ताकीद देण्यात आली आहे. गंभीर आणि कोहलीने आपली चूक मान्य केली आहे.