भारत-वेस्ट इंडिज सामन्याने होणार महिला विश्वचषकाचा श्रीगणेशा
विश्वचषक म्हणजे साध्या शब्दांत वर्णन करायचे म्हणजे कुंभमेळा. महिला क्रिकेटविश्वाचा कुंभमेळा गुरुवारपासून भारतात भरत असून ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याने याची सुरुवात होणार आहे. विश्वचषक मुंबईत असला तरी या स्पर्धेला अजूनही हवी तशी प्रसिद्धी किंवा ग्लॅमर मिळालेले नाही.
या स्पर्धेतील ‘अ’ गटात भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे संघ आहेत. ‘अ’ गटाचे सामने ब्रेबॉर्न स्टेडियम, एमआयजी क्लब आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहेत. ‘ब’ गटामध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे सामने कटक येथील दोन मैदानांवर होणार आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील दिवस-रात्र सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. तर भारताचा दुसरा सामना ३ फेब्रुवारीला तीन वेळा विश्वविजेत्या इंग्लंडशी होणार आहे, तर तिसरा साखळी सामना श्रीलंकेबरोबर ६ फेब्रुवारीला ब्रेबॉर्नवरच खेळवण्यात येणार आहे.
भारताची कर्णधार मिताली राजकडे दांडगा अनुभव आहे, त्यामुळे तिच्याकडून मोठय़ा अपेक्षा असतील. त्याचबरोबर माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी, गौहर सुलताना व निरंजना नागराजन यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असेल. तर फलंदाजीमध्ये मितालीबरोबरच धडाकेबाज फलंदाज पूनम राऊतवर साऱ्यांचे लक्ष असेल. त्याचबरोबर यष्टीरक्षक सुलक्षणा नाईककडूनही चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.
संघात झुलनबरोबर अमिता शर्मा, उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याकडे चांगला अनुभव आहे. कामिनी आणि करुणा यांचे संघात पुनरागमन झाले आहे. संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंचा चांगला समन्वय असून आमच्याकडून नक्कीच चांगली कामगिरी होईल, अशी आशा भारताची कर्णधार मितालीने व्यक्त केली.

भारतीय संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), एकता बिश्त, अमिता दास, झुलान गोस्वामी, पूनम राऊत, करुणा जैन, रीमा मल्होत्रा, मोना मेश्राम, थिरुशकामिनी मुरुगेसन, सुलक्षणा नाईक, निरंजन नागराजन, रसनारा परवीन, शुभलक्ष्मी शर्मा आणि गौहर सुलताना.
स्थळ : ब्रेबॉर्न स्टेडियम, वेळ : दु. २.३० पासून,
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेटवर आणि स्टार क्रिकेट एचडी.