11 December 2017

News Flash

लढाई मालिका वाचवण्याची

दुसरी आणि तिसरी कसोटी गमावल्यामुळे भारतीय संघावर सातत्याने होणारी विखारी टीका.. महेंद्रसिंग धोनीचे धोक्यात

विक्रम हरकरे नागपूर | Updated: December 13, 2012 4:13 AM

* मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारत सज्ज
* संघर्षांची नागपूर कसोटी आजपासून
दुसरी आणि तिसरी कसोटी गमावल्यामुळे भारतीय संघावर सातत्याने होणारी विखारी टीका.. महेंद्रसिंग धोनीचे धोक्यात आलेले कर्णधारपद.. धोनी आणि गंभीर यांच्यातील वाद.. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीविषयी उठणाऱ्या उलटसुलट चर्चा.. अशा समस्येच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय संघाला मायदेशात मालिका गमावण्याची नामुष्की टाळण्यासाठी झुंज द्यावी लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला गुरुवारपासून नागपुरातील जामठा स्टेडियमवर सुरुवात होत असून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेला सचिन तेंडुलकर आणि कसोटी कर्णधारपदावर टांगती तलवार असलेला महेंद्रसिंग धोनी यांच्यासाठी ही कसोटी निर्णायक भूमिका बजावणार असल्याने त्यांच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर मालिका जिंकूनच मायदेशी परतण्याचा इंग्लंड संघाचा निर्धार आहे.
सोमवारपासून नागपुरात आलेल्या दोन्ही संघातील खेळाडूंनी दोन्ही दिवस कसून सराव करून शेवटचा सामना रंगतदार होण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय खेळाडूंना मनोबल, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी तसेच तंदुरुस्ती अशा चारही आघाडय़ांवर कठोर कामगिरी बजावण्याशिवाय पर्याय नाही. धोनी आणि तेंडुलकर यांची मालिकेतील कामगिरी अत्यंत सुमार झाल्याने दोघांची कारकीर्द धोक्यात सापडली आहे. जिद्द आणि निर्धाराने खेळल्यास नागपूर कसोटीत धक्कादायक ‘कमबॅक’ करणे भारताला कठीण नाही. सलामीची जोडी वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी खेळपट्टीवर टिकून राहण्याची जिद्द दाखविलेली नाही. मधल्या फळीतील फलंदाजांपैकी चेतेश्वर पुजारा वगळता पाठीचा कणा मोडल्यागत स्थिती दिसून आली आहे. सचिनने मागील पाच डावांत अवघ्या ११० धावा केल्याने त्याच्यावर प्रचंड दबाव आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीनंतर एकही मोठी खेळी केलेली नाही, हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. गेल्या सहा डावांत त्याला फक्त ८५ धावाच काढता आल्या. धोनीची कर्णधार, यष्टिरक्षक आणि फलंदाज म्हणून कामगिरी सपशेल कोलमडल्याने या कसोटीत त्याला मोठय़ा कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे भाग आहे. ही कसोटी त्याच्या कौशल्याची परीक्षा पाहणारी ठरेल. मधल्या फळीतील फलंदाजांपैकी युवराज सिंगला वगळून रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. सौराष्ट्रचा हा संयमी फलंदाज पहिली कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आठवडाभरापूर्वी जडेजाने रेल्वेविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावून निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. जडेजा डावखुरी गोलंदाजीही करू शकतो. त्याची गोलंदाजी प्रग्यान ओझापेक्षा थोडी वेगवान आहे. हरभजनच्या जागेवर पीयूष चावलाला संधी मिळाल्याने तो कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. झहीर खानची जागा दिल्लीचा वेगवान गोलंदाज परविंदर अवाना घेऊ शकतो परंतु, ईशांत शर्मा आणि अशोक दिंडा यांच्यापैकी कोणाला निवड समिती संधी देणार याचा फैसला उद्याच होईल. त्यामुळे अवानाच्या समावेशाबाबत काहीच निश्चित नाही.
इंग्लंड संघाला २८ वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याची संधी चालून आली आहे. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक आणि निक कॉम्प्टन यांनी संयमाने खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावलेला आहे. अ‍ॅलेस्टर कुकने त्याची कसोटी कारकीर्द सहा वर्षांपूर्वी नागपूरच्या सिव्हिल लाइन्समधील व्हीसीएच्या मैदानावर शतक ठोकून सुरू केली होती. योगायोगाने इंग्लंडचा कर्णधार म्हणून निर्णायक कसोटीही नागपूर येथे खेळत आहे. इंग्लंडचे फिरकीपटू मालिकेत सातत्याने जबरदस्त कामगिरी करीत आहेत. मॉन्टी पानेसरने दोन कसोटींत १६ बळी तर ग्रॅमी स्वानने तीन कसोटींत १७ बळी घेऊन भारतीय फलंदाजांना नाचविले आहे. वेगवान जेम्स अँडरसन तंदुरुस्त झाला असून स्टीव्हन फिन हादेखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रिव्हर्स स्विंगने त्यांनी कोलकाता कसोटीत भारतीय फलंदाजांची भंबेरी उडविली होती. उपकर्णधार स्टुअर्ट ब्रॉड उजव्या पायाच्या टाचेला दुखापत झाल्याने कसोटीला आणि दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे.

फिरकी गोलंदाजांसाठी खेळपट्टी पोषक
शेवटच्या कसोटीत विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी आसुसलेल्या भारतीय संघाने सामन्याच्या आदल्या दिवशीही कसून सराव केला, मात्र खेळपट्टीचा अंदाज अद्याप कोणालाही आलेला नाही. नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून खेळपट्टीवर फिरकीपटूंचेच वर्चस्व राहू शकते, असे सूत्रांकडून समजते. जामठय़ाची खेळपट्टी आतापर्यंतच्या सामन्यांच्या तुलनेत वेगळी असल्याचे समजते. खेळपट्टीचा रंग पांढरा असून ती वरवर टणक दिसत आहे, परंतु दोन दिवसांनंतर खेळपट्टीला तडे गेल्यास, सामन्याचे चित्र पालटेल, असे बोलले जात आहे. कोरडी वाटणारी ही खेळपट्टी प्रत्यक्षात फिरकीपटूंनाच साह्य़ देणारी ठरणार आहे.    

प्रतिस्पर्धी संघ :
भारत :  महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, पीयूष चावला, इशांत शर्मा, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, अशोक दिंडा, मुरली विजय, परविंदर अवाना.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जेम्स अँडरसन, टिम ब्रेस्नन, निक कॉम्प्टन, समित पटेल, केव्हिन पीटरसन, मॅट प्रायर, जोनाथन ट्रॉट, स्टुअर्ट ब्रॉड, जो रूट, जॉन बेअरस्टो, ग्रॅहम ओनियन्स, इऑन मॉर्गन, मॉन्टी पनेसार आणि स्टुअर्ट फिन.
सामन्याच्यी वेळ : सकाळी ९.३० वा.पासून,
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स.    

राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची घसरण सुरू आहे. अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर संघातील अन्य खेळाडूंवरील दबाव वाढणे स्वाभाविकच आहे. गेल्या दोन कसोटींत भारताची दाणादाण उडाली, हे मान्य आहे. यशाच्या शिखरावर असताना प्रशंसेचे पूल बांधणारेच आज टीका करत आहेत. परंतु, वाईट परिस्थितीवर मात करण्याची क्षमता भारतीय संघात असल्याने मालिकेत बरोबरी साधण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोणी कितीही सल्ले दिले तरी मैदानावर कामगिरी खेळाडूंनाच करावी लागते.
– महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार.

इंग्लंड संघाने भारतीय खेळपट्टय़ांवर केलेल्या कामगिरीचे नक्कीच आश्चर्य वाटत आहे. अहमदाबादची पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी ज्या आकस्मिकपणे नंतरच्या दोन्ही कसोटी जिंकून वरचष्मा गाजवला, त्याने मी थक्क झालो आहे. कोलकाता कसोटीत सांघिक खेळामुळे इंग्लंडने विजय मिळवला.
नागपूरलाच आपली कसोटी कारकीर्द सुरू झाली असली तरी प्रत्येक खेळाडूने भावनांना थारा न देता खेळावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय कोणाचीही कामगिरी चांगली होऊ शकत नाही.
– अ‍ॅलिस्टर कुक, इंग्लंडचा कर्णधार.

धोनीला वगळण्याची ही वेळ नव्हे -गावस्कर
महेंद्रसिंग धोनीला कसोटी संघातून वगळण्याची ही योग्य वेळ नव्हे. कर्णधारपदासाठी धोनीऐवजी कोणताही पर्याय सध्या उपलब्ध नाही,  असे मत ज्येष्ठ फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.  नागपूर कसोटीनंतर धोनीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. निवड समितीच्या निर्णयाविषयी अमरनाथ यांचे वक्तव्य अत्यंत निर्भय आहे. निवड समितीच्या निर्णयानंतर बोर्डाला अंतिम निर्णयापूर्वी विचारले जाते. त्यामुळे श्रीनिवासन यांचे मत विचारात घेतल्यास त्यात वावगे काहीच नाही.     

सचिनने फेरविचार करावा -अक्रम
सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजाला निवृत्ती घ्यायला सांगणे निवड समितीला कठीण जाऊ शकते, म्हणूनच सचिनने स्वत:च कारकिर्दीबाबत फेरविचार करावा, असे आवाहन पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रमने केले आहे. ‘‘जेव्हा संघाचा प्रमुख फलंदाज दोन वर्षांहून अधिक काळ शतक झळकावू शकत नाही, तेव्हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. म्हणूनच सचिनने फेरविचार करण्याची गरज आहे,’’ असे अक्रमने सांगितले.     

First Published on December 13, 2012 4:13 am

Web Title: fight to save series
टॅग Cricket,Sports