स्पर्धा सुरू असताना खुच्र्याची फेकाफेक ; काही मल्ल जखमी; पोलीस यंत्रणा कुचकामी

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पहिल्या दिवशी दोन मल्लांनी घेतलेल्या उत्तेजक द्रव्याने  गालबोट लागले होते. शनिवारी मात्र खेळाला काळीमा फासणाऱ्या गोष्टींनी टोकच गाठले. पराभूत झालेले मल्ल, त्यांचे समर्थक आणि प्रेक्षकांमध्ये यावेळी तुफानी हाणामारी झाली. स्पर्धा सुरू असताना खुच्र्याच्या झालेल्या फेकाफेकीत अनेकांसह काही मल्ल रक्तबंबाळ झाले. हा सर्व प्रकार सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने मात्र पोलिसांची कुठलीही उपाययोजना नसल्यामुळे आयोजकांना हा वाद मिटवावा लागला.

महाराष्ट्र केसरी खुल्या गटात गादी विभागातील उपांत्य सामन्यात पुण्याच्या महेश मोहोळने पुणे जिल्ह्य़ाच्या बापू खाणेकरचा पराभव केला. पराभवानंतर बापूचे समर्थक आणि त्याचा भाऊ बाहेर बसले होते. अपयशी ठरलेल्या खाणेकरला कामल्ली तालुक्यातील अनिल अशोक मछले या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मल्लाने डिवचले. त्यामुळे मछले आणि खाणेकर या दोन गटात आधी शाब्दिक चकमक झडली. त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांच्या समर्थकांनी एकमेकांवर खच्र्या भिरकवल्यामुळे सुरू असलेले सामने थांबविण्यात आले. व्यासपीठावरील आयोजकांनी खाली उतरून मध्यस्थी केली. मात्र त्यांनी आयोजकांना जुमानले नाही. हा प्रकार पाच मिनिटे सुरू होता. एका समर्थकाने मल्ल बापू खाणेकरच्या डोक्यात खुर्चीचा जोरदार प्रहार केल्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्या वेळी स्टेडियमच्या सुरक्षेसाठी असलेल्या काही सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मल्लाला डिवचणाऱ्या कामल्लीच्या तरुणाला चांगलाच चोप बसला. या घटनेनंतर पोलीस आले आणि त्यांनी कामल्लीच्या तरुणाला ताब्यात घेतले. दरम्यान, बापू खाणेकर व त्याच्या समर्थकांनी मैदानातून पळ काढला.

या प्रकरणातच मध्यस्थी करण्यासाठी आलेले माजी महाराष्ट्र केसरी गायकवाड यांना त्याचा फटका बसला. त्यांच्या खिशातून महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली. या गोंधळाचा लाभ घेत चोरटय़ांनी अनेकांच्या खिशावर हात साफ केला. गोंधळ घालणाऱ्या आणखी काही कामल्लीतील युवकांना आणि मल्लांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस व्यवस्था तोकडी

या स्पर्धेच्या दरम्यान राज्यातून बरेच मल्ल आणि त्यांचे समर्थक नागपुरात आले आहेत. शिवाय, शनिवार असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रेक्षक आले असताना पोलिसांची सुरक्षा व्यवस्था मात्र अतिशय तोकडी होती. ज्या वेळी हाणामारी झाली त्या वेळी मैदानात केवळ दोन पोलीस सुरक्षेसाठी होते. मात्र घटनेनंतर पोलीस ताफा मैदानात पोहोचला, पण तोपर्यंत आयोजकांनी हा वाद शांत केलेला होतो.

अंतिम फेरी आज

साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यंदाचा महाराष्ट्र केसरीसाठी कोणत्या दोन मल्लांमध्ये लढत होणार, हे रविवारीच् स्पष्ट होणार आहे. स्पर्धेतील गादी विभागात पुण्याच्या महेश मोहोळ व मुंबईच्या विक्रांत जाधव यांच्यात, तर माती विभागात गतविजेता जळगावचा विजय चौधरी आणि बाळा रफीक शेख यांच्या अंतिम लढत होणार आहे. या दोन्ही गटातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरीची लढत होईल.

शुक्रवारी झालेल्या उपांत्य लढतींमध्ये विक्रांत जाधवने  प्रतिस्पर्धी सोलापूरच्या समाधान पाटीलला १०-० असे पराभूत केले, तर महेश मोहोळ व राहुल खानेकर या दोन्ही पुण्याच्या मल्लांमधील लढत चांगली चुरशीची ठरली. मात्र, निर्णायक क्षणांमध्ये महेशने आक्रमक खेळ करत ५-३ अशा गुणफरकाने विजय मिळविला.

माती विभागात पहिली उपांत्य सामन्यात सोलापूरच्या बाळा रफिक शेख व बीडच्या गोकुळ आवारे यांच्यात झाली. या लढतीत बाळा रफिकला १०-४ असा विजय मिळविताना चांगलाच घाम गाळावा लागला. याच गटातील दुसरी लढतही चांगली उत्कंठापूर्वक झाली असून सर्वाचे या लढतीकडे लक्ष होते.

गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी व साताऱ्याच्या किरण भगत यांच्यात लढत झाली. यात विजय चौधरी वेळ घेत असल्याने किरणला पंचांनी एक गुण बहाल केला. त्यानंतर पुन्हा किरणने दोन गुण नोंदवत आघाडी वाढवली. मात्र, विजयने पुढच्या क्षणाला एक डाव टाकत दोन गुण मिळवले. त्यानंतर किरणला पंचांनी पुन्हा एकदा गुण दिल्याने ४-२ असे गुण झाले होते. मात्र, निर्णायक क्षणी विजयने भारंदाज डाव टाकत दोन गुण मिळवत ४-४ अशी बरोबरी साधली. शेवटच्या क्षणाला निर्णायक गुण नोंदवल्याने चौधरीला विजयी घोषित केले.