फुटबॉलच्या फ्रेंच लीग १ स्पर्धेतील एका सामन्यात खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. एलियांज रिविएरा मैदानात सामन्यातील ७६ व्या मिनिटाला ही घटना घडली. नीस आणि मार्सेयल या दोन संघात सुरु  असलेल्या सामन्यात खेळाडू आणि प्रेक्षकांची बाचाबाची झाली. यावेळी प्रेक्षक थेट मैदानात उतरले आणि हाणामारी केली. काही जणांनी खेळाडूंवर बाटल्याही फेकल्या.

नीस आणि मार्सेयल यांच्या सामना सुरु होता. सामना रंगतदार वळणावर आला होता. नीस या खेळात १-० ने आघाडी घेतली होती. त्यामुळे मार्सेयलचे खेळाडू आक्रमकपणे बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान ७६ व्या मिनिटाला प्रेक्षकामधून नीसच्या एका चाहत्याने मार्सेयलच्या खेळाडूवर बाटली फेकली. यानंतर मार्सेयलकडून खेळणाऱ्या फ्रेंच खेळाडूने दिमित्री पायेटला उत्तर देत बाटली नीसच्या प्रेक्षकांकडे फेकली. यानंतर प्रेक्षकांना राग अनावर झाला आणि ते मैदाना घुसले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनाही आक्रमक प्रेक्षकांना अडवता आलं नाही. त्यामुळे चाहते आणि खेळाडू यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर मार्सेयलच्या खेळाडूंची सुरक्षेच्या कारणास्तव सामन स्थगित करण्यात आला. सामना रोखला गेला त्यावेळी नीसने १-०ने आघाडी घेतली होती.

या घटनेनंतर दोन्ही क्लबच्या अध्यक्षांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले आहेत. नीसचे अध्यक्ष जीन पिएरा यांनी सामना स्थगित केल्याने नाराजी व्यक्त केली आहे. “मार्सेयलला हा सामना स्थगित करायचा होता. त्यामुळेच त्यांनी हा बनाव रचला”, असा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे मार्सेयल क्लबचे अध्यक्ष पाब्लो लोन्गोरिया यांनी पलटवार करत आरोप फेटाळून लावले आहेत. “आमच्या खेळाडूंवर हल्ला झाल. सामनाधिकारी आमच्यासोबत होते. सामनाधिकाऱ्यांना आमच्या खेळाडूंची चिंता वाटत होती. यासाठी त्यांनी सामना पुन्हा सुरु केला नाही”, असं पाब्लो लोन्गोरिया यांनी सांगितलं.