आगामी वर्ल्ड हॉकीलीग अंतिम स्पर्धेत यजमान भारताचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. या स्पर्धेत भारताचा समावेश विश्वविजेता ऑस्ट्रेलिया, रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता जर्मनी यांच्या गटात करण्यात आलेला आहे. याव्यतिरीक्त ‘ब’ गटात भारताला इंग्लंडचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही स्पर्धा म्हणावी तितकी सोपी राहणार नाहीये.  १ ते १० डिसेंबरदरम्यान ओडीशातील भुवनेश्वर शहरात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

आंतराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने आज या महत्वाच्या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. यात भारताचा सलामीचा सामना १ डिसेंबरला ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत पहिलाच पेपर भारतासाठी कठीण जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. १ ते ५ डिसेंबरदरम्यान या स्पर्धेचे साखळी सामने खेळवले जाणार आहेत. तर ६ आणि ७ डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जातील. यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये उपांत्य फेरीचे सामने खेळवले जातील आणि अंतिम फेरीचा सामना हा १० डिसेंबरला खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – ओल्टमन्स यांचा वारसदारासाठी हॉकी इंडियाची जाहीरातबाजी?

प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय हॉकी संघात वातावरण ढवळून निघालेलं आहे. ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर सध्या हॉकी इंडिया नवीन प्रशिक्षकांच्या शोधात आहे. सध्या भारतीय संघाची जबाबदारी High Performance Director डेव्हिड जॉन सांभाळत आहेत. मात्र महत्वाच्या स्पर्धेआधी भारतीय संघाला कायमस्वरुपी प्रशिक्षक न मिळाल्यास भारतीय संघासमोरची आव्हानं अधिकच खडतर होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – ओल्टमन्स यांचा उत्तराधिकारी मीच – हरेंद्रसिंह

अशी असेल स्पर्धेतील संघांची गटवारी –

गट अ – अर्जेंटीना, बेल्जियम, नेदरलँड, स्पेन
गट ब – ऑस्ट्रेलिया, भारत, जर्मनी, इंग्लंड

अवश्य वाचा – BLOG : बुडत्याचा पाय खोलात !