टोकियो ऑलिम्पिकआधी, आंतरराष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रो-हॉकी लिग स्पर्धेत सहभागी होण्याचा हॉकी इंडियाचा निर्णय भारतीय संघासाठी फायदेशीर ठरताना दिसतो आहे. पहिल्या फेरीत नेदरलँडला पराभूत केल्यानंतर, बेल्जियमविरुद्धचा पहिला सामनाही भारतीय संघाने २-१ च्या फरकाने जिंकला आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा हॉकी स्टेडीयमवर हा सामना रंगला…ज्यात भारताने धडाकेबाज खेळ करत विजय मिळवला. बेल्जियमसचा संघ सध्या गुणतालिकेत ११ गुणांनिशी पहिल्या स्थानी आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात बेल्जियमने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला त्यांच्यात देशात पराभूत करण्यात बेल्जियमचा संघ यशस्वी ठरला होता. मात्र भारतात खेळताना बेल्जियमला पहिल्याच सामन्यात धक्का बसलेला आहे.
गोलकिपर पी.आर.श्रीजेश आजच्या सामन्याचा हिरो ठरला. सुरुवातीच्या सत्रापासून त्याने बेल्जियमच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंच्या चाली हाणून पाडल्या. मात्र भारतीय संघाने पहिल्या सत्रापासून धडाकेबाज खेळ करत बेल्जियमवर दबाव आणला. मनदीप सिंहने दुसऱ्या मिनीटाला सुरेख मैदानी गोल करत सामन्यात आघाडी घेतली. यानंतर बेल्जियमने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, मात्र मध्यांतरापर्यंत भारताने आपली १-० अशी आघाडी टिकवून ठेवली.
मध्यांतरानंतर ३३ व्या मिनीटाला बेल्जियमकडून गॉथिअर बोकार्डने पेनल्टी कॉर्नरवर श्रीजेशचा बचाव भेदत बेल्जियमला सामन्यात १-१ अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या सत्रात भारतालाही पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती, मात्र भारतीय खेळाडू यात अपयशी ठरले. अखेरीस चौथ्या सत्राच्या सुरुवातीला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर मारलेल्या फटक्याला रमणदीपने हलकेच गोलपोस्टची दिशा दाखवत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बेल्जियमने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, मात्र भारताच्या बचावफळीसमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2020 7:26 pm