27 February 2021

News Flash

‘एफआयएच’ प्रो हॉकी लीग : भारतासमोर बेल्जियमचे आव्हान

२०१९ मध्ये झालेल्या पहिल्या प्रो हॉकी लीगमधून भारताने माघार घेतली होती.

(संग्रहित छायाचित्र)

‘एफआयएच’ प्रो हॉकी लीगमध्ये यशस्वी पदार्पण केल्यानंतर आता आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय पुरुष संघाला बेल्जियमच्या खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शनिवारी आणि रविवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताला जगज्जेत्या बेल्जियमशी दोन हात करावे लागतील.

२०१९ मध्ये झालेल्या पहिल्या प्रो हॉकी लीगमधून भारताने माघार घेतली होती. पण ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारतीय संघाने यंदा मात्र या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्सविरुद्धची सलामीची लढत जिंकून भारताने या स्पर्धेत स्वप्नवत पदार्पण करत पाच गुणांची कमाई केली आहे.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारतीय हॉकी संघाने दोन्ही लढतींत मिळून नेदरलँड्सवर ५-२ असा विजय मिळवला होता.

भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून बेल्जियमने चार सामन्यांत ११ गुणांची कमाई करत अग्रस्थान पटकावले आहे. बेल्जियमने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडवर विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र घरच्या मैदानावर खेळणाऱ्या यजमानांच्या खडतर आव्हानाची त्यांना कल्पना आहे.

भारताला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार असला तरी याच कलिंगा स्टेडियमवर बेल्जियमने २०१८ मध्ये हॉकी विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. याविषयी बेल्जियमचा कर्णधार थॉमस ब्राएल्स म्हणाला की, ‘‘भारताकडून आम्हाला कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सुधारणा केली असून आम्ही आमचा नैसर्गिक खेळ करण्यावर भर देणार आहोत. कलिंगा स्टेडिमयवर पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाल्याने दोन वर्षांआधीच्या आठवणी पुन्हा ताजा झाल्या.’’

१०

भारत आणि बेल्जियम यांच्यात आतापर्यंत १० सामने झाले असून पाहुण्या संघाने आठ वेळा बाजी मारली आहे तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे सर्व संघ या स्पर्धेत खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी दोन हात करताना आम्हाला आमच्या कच्च्या दुव्यांवर मेहनत घेता येईल. या स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकआधी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होण्याचा आमचा मानस आहे. भारतीय संघातील युवा खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

– मनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार

* सामन्याची वेळ : सायंकाळी ५ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ आणि २ एचडी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:43 am

Web Title: fih pro hockey league belgiums challenge to india abn 97
Next Stories
1 टाटा खुली टेनिस स्पर्धा : ऑलिम्पिक विजेता घडवण्याचे पेसचे ध्येय
2 राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत, अपूर्वाला राष्ट्रीय विजेतेपद
3 Ind vs NZ : मालिका वाचवण्याचे भारतापुढे आव्हान
Just Now!
X