भुवनेश्वर : ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारताच्या पुरुष संघाचा ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या पदार्पणीय हंगामात कस लागणार आहे. शनिवारी भारताची गाठ जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्सशी पडणार आहे. कलिंगा स्टेडियमवरच २०१८च्या विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँड्सने भारताचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारत उत्सुक आहे.

‘एफआयएच’ प्रो लीगच्या पहिल्या हंगामात सहभागाची संधी हुकलेल्या भारताच्या २०१९मधील प्रो लीग विजेत्या आणि युरोपियन कांस्यपदक विजेत्या नेदरलँड्सशी कलिंगा स्टेडियमवर दोन लढती होणार आहेत. यापैकी दुसरी लढत रविवारी होणार आहे.

भारताचे नेदरलँड्स, विश्वविजेते बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सामने होणार आहेत. त्यानंतर भारत जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनशी त्यांच्या देशात सामने खेळेल. मग पुन्हा मायदेशात भारताचे न्यूझीलंड आणि अर्जेटिनाशी सामने होणार आहेत. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ स्पेनशी जूनमध्ये प्रो लीगमधील अखेरचे राऊंड-रॉबिन सामने खेळणार आहे.

प्रो लीगमधील आमच्या पहिल्या तीन लढती जागतिक हॉकीमधील मातबर संघांविरुद्ध आहेत. ऑलिम्पिक अभियानाच्या दृष्टीने संघबांधणी करण्याकडे आम्ही या स्पर्धेत लक्ष केंद्रित करणार आहोत. कलिंगा स्टेडियमवर भारतीय संघ असंख्य सामने खेळला असल्याचा फायदा आम्हाला मिळेल.

-ग्रॅहम रीड, भारताचे हॉकी प्रशिक्षक