आर्थिक अडचणीमुळे संकटात सापडलेल्या पाकिस्तान हॉकी संघाला आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने आणखी एक धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या हॉकी प्रो-लीग स्पर्धेमधून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तान हॉकी संघटनेने आपण काही अपरिहार्य कारणांमुळे अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघाविरुद्धचे पहिले 3 सामने खेळू शकणार नसल्याचं कळवलं होतं.

त्यामुळे स्पर्धेच्या वेळापत्रकात कोणतीही बाधा न येण्यासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने पाकिस्तान संघाला संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या आठवड्यातील शनिवारी स्पेनमधील व्हेलेनसियामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी हॉकी संघटनेने घेतलेला निर्णय हा अतर्क्य होता, त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता असं स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी थेरी वेल यांनी दिलं आहे.

नुकत्याच भुवनेश्वर येथे पार पडलेल्या हॉकी विश्वचषकात पाकिस्तानचा संघ सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र मोक्याच्या क्षणी पाकिस्तानातील क्रिकेट संघाने हॉकी संघटनेला आपलं प्रायोजकत्व देऊ केलं. त्यामुळे पाकिस्तानचा संघ भारतात विश्वचषकासाठी येऊ शकला. दरम्यान ग्रेट ब्रिटन आणि स्पेन यांच्यामध्ये हॉकी प्रो-लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे.