सांघिक समन्वय व भक्कम बचावाचा अभाव यामुळेच भारताला जागतिक हॉकी लीगमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा हाराकिरीस सामोरे जावे लागले. हा सामना ऑस्ट्रेलियाने ५-१ असा जिंकून पुरुषांच्या गटात उपांत्य फेरी गाठली. महिलांमध्ये नेदरलँड्सने भारताचे आव्हान ८-१ असे संपुष्टात आणले.
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत अनेक वर्षांमध्ये वर्चस्व दाखविता आलेले नाही. ऑलिम्पिकविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय खेळाडू नेहमीच दडपणाखाली खेळतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला. ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी भक्कम आघाडी घेत विजय निश्चित केला होता. या पराभवामुळे विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविण्याच्या भारताच्या आशा दुरावल्या गेल्या.
ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन सॅम्पसन (पहिले मिनिट), मॅथ्यु गोहदेस (१९ वे मिनिट), रुसेल फोर्ड (२३ वे मिनिट) व ट्रेन्ट मिटॉन (४२ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताच्या संदीप सिंगकडून २१ व्या मिनिटाला स्वयंगोल केला गेला. भारताचा एकमेव गोल २०व्या मिनिटाला चेंगलेनसेना याने केला.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला पेनल्टी-कॉर्नरद्वारा सॅम्पसनने केलेल्या गोलमुळे ऑस्ट्रेलियाने थाटात सुरुवात केली. त्यानंतर बेशिस्त वर्तनाबद्दल भारताच्या धरमवीर सिंगला दहा मिनिटे मैदानाबाहेर जावे लागले. १९ व्या मिनिटाला भारताच्या बचावफळीतील विस्कळितपणाचा फायदा घेत गोहदेसने ऑस्ट्रेलियाची आघाडी २-० अशी वाढवली. चेंगलेनसेनाने भारताचा एकमेव गोल करीत ही आघाडी कमी केली. ऑस्ट्रेलियाचे आक्रमण रोखताना संदीपच्या चुकीमुळे भारताला तिसरा गोल खावा लागला. रुसेल फोर्डने चौथा गोल केल्यानंतर ट्रेन्ट मिटॉनने पाचव्या गोलाची भर घातली. ऑस्ट्रेलियाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. भारतानेही गोल करण्याच्या दोन ते तीन संधी वाया घालविल्या.
भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात
रॉटरडॅम : भारतीय महिलांचे जागतिक हॉकी लीगमधील आव्हान बुधवारी संपुष्टात आले. नेदरलँड्सने भारताचा ८-१ असा दणदणीत पराभव केला. या सामन्यावर सुरुवातीला भारतीय खेळाडूंचे नियंत्रण होते. मात्र गोल करण्यात त्यांना यश मिळाले नाही. २१व्या मिनिटाला किम लॅमर्सने हॉलंडचे खाते उघडले. त्यानंतर दोन मिनिटांनी कर्णधार मार्टिज पॉमन हिने संघाचा दुसरा गोल नोंदविला. उत्तरार्धात सुरुवातीला एलेन हूग हिने त्यांचा तिसरा गोल केला. भारतातर्फे वंदना कटारिया हिने ४८ व्या मिनिटाला गोल करत पिछाडी कमी केली. मात्र ४९ व्या मिनिटाला हॉलंडच्या व्हॅलेरिया मॅगीस हिने चौथा गोल केला. त्यानंतर इव्हा डीगुडे हिने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करीत हॉलंडला ५-१ असे आघाडीवर नेले. सॅबिनी मोल (६३ वे मिनिट) व पॉमन (६५ वे मिनिट) यांनी गोल करत हॉलंडला मोठा विजय मिळवून दिला.