आंतरराष्ट्रीय मास्टर हिमांशू शर्मा (२३९८ मानांकन गुण) याने ग्रँडमास्टर जी. एन. गोपाळ (२५२६ मानांकन गुण) याच्यावर निर्णायक विजय मिळविला, त्यामुळेच पुणे अ‍ॅटॅकर्सला महाराष्ट्र बुद्धिबळ प्रीमिअर लीगमध्ये अंतिम फेरी गाठता आली. उपांत्य फेरीत त्यांनी अहमदनगर चेकर्सचा ३.५-२.५ असा पराभव केला. अन्य उपांत्य फेरीत जळगाव बॅटलर्स संघाने नागपूर रॉयल्सचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे व नगर यांच्यातील लढत चुरशीने खेळली गेली. नगरकडून खेळणाऱ्या ग्रँडमास्टर एम. व्यंकटेश याने पुण्याच्या ग्रँडमास्टर स्वाती घाटे हिच्यावर मात केली व संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. तथापि नगरचा आंतरराष्ट्रीय मास्टर शार्दूल गागरे (२३६०) याला अमरदीप बारटक्के (२१९४) याने पराभूत करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. सागर शहा (२३७६) याने पुणे संघाची आंतरराष्ट्रीय मास्टर पद्मिनी राऊत हिला पराभूत करीत नगरला २-१ असे अधिक्य मिळवून दिले. नगरचे प्रतिनिधित्व करणारी ऋचा पुजारी हिला एम. ललित बाबू याने पराभूत करीत पुन्हा २-२ अशी बरोबरी केली. या बरोबरीनंतर एकाच वेळी तानिया सचदेव (नगर) व अक्षयराज कोरे (पुणे) तसेच जी. एन.  गोपाळ (नगर) व हिमांशू शर्मा (पुणे) या लढती सुरू होत्या. शर्मा याने डावाच्या शेवटी गोपाळने केलेल्या चुकांचा फायदा घेत शानदार विजय मिळविला. ऐंशीपेक्षा जास्त चालींपर्यंत रंगतदार झालेल्या या डावात ६८ व्या चालीस शर्मा याने एका प्यादाची आघाडी घेतली आणि हीच आघाडी त्यासाठी विजय मिळवून देणारी ठरली. हा डाव जिंकून शर्माने पुण्यास ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. शर्माचा विजय निश्चित झाल्यानंतर कोरे याने सचदेव हिच्याविरुद्धच्या डावात धोका न पत्करता बरोबरी स्वीकारली. शर्मा व कोरे यांनी संघाच्या विजयाचे श्रेय संघाचे प्रशिक्षक डी. व्ही. प्रसाद यांच्या मार्गदर्शनास दिले.
नागपूरचे आव्हान संपुष्टात
जळगाव संघाने नागपूरला हरविले, त्या वेळी त्यांच्याकडून ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने स्वप्नील धोपाडे याचा पराभव केला. जळगाव संघाच्या समीर कठमाळे याने महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामिनाथन हिच्याविरुद्ध विजय मिळविला. जळगावचे प्रतिनिधित्व करताना आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीनाथ नारायण याने ग्रँडमास्टर सहज ग्रोव्हर याच्यावर मात करीत आश्चर्यजनक विजय मिळविला. एस.एल.नारायणन (जळगाव) याने चिन्मय कुलकर्णी याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. नागपूरच्या श्वेता गोळे हिने ग्रँडमास्टर एस.मीनाक्षी हिला बरोबरीत रोखले. नागपूरकडून एकमेव विजय मिळविला तो आशियाई विजेत्या तेजस बाक्रे याने. त्याने ईशा करवडे हिला पराभूत केले. पुणे व जळगाव यांच्यातील अंतिम सामना रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांकडून प्रत्येकी सहा खेळाडू सामना खेळणार आहेत.