साऊदम्प्टन येथे १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी स्पष्ट केले. सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ब्रिटनचा ‘लाल यादीत’ समावेश करण्यात आला तरी भारतीय संघ ब्रिटनमध्ये दाखल होईल, असेही ‘आयसीसी’ने सांगितले.

ब्रिटनमध्ये कोणत्याही देशांच्या नागरिकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याचबरोबर ब्रिटनमधील रहिवाशांना मायदेशी परतण्यासाठी १० दिवसांचे विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. जैव-सुरक्षित वातावरणात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत आयोजित करण्याचा विश्वास ‘आयसीसी’ने व्यक्त केला.

‘‘इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ तसेच अन्य सदस्यांना करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कसे आयोजन करावे, याची चिंता सतावत आहे. पण आम्ही मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपदाची लढत आयोजित करण्याबाबत आश्वस्त आहोत. त्यामुळे ही लढत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिटनचा लाल यादीत समावेश करण्यात आला असला तरी आम्ही ब्रिटन सरकारशी चर्चा करीत आहोत,’’ असे ‘आयसीसी’च्या पत्रकात म्हटले आहे.

‘‘या क्षणी काहीही सांगणे उचित ठरणार नाही. भारतीय संघ जूनच्या पहिल्या आठवड्यात ब्रिटनला रवाना होणार आहे. जूनमध्ये परिस्थिती कशी असेल, हे आताच सांगता येणार नाही. करोनाची स्थिती पाहून प्रवासाबाबतीत प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्यात येते. मात्र जूनमध्ये ब्रिटनचा लाल यादीत समावेश असेल तर आम्हाला १० दिवस कठोर विलगीकरणात राहावे लागेल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय महिला संघही जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर पुरुष संघही ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ‘आयपीएल’चा अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबाद येथे आटोपल्यानंतर काही दिवसांतच भारतीय संघ लंडनला रवाना होणार आहे.