सुरुवात असलेल्या प्रत्येक गोष्टीला शेवट हा अटळच असतो. सूर्योदयाचा शेवट जसा सूर्यास्ताने होतो तशाच प्रकारे ही एका शेवटाची सुरुवात आहे. ‘सचिन.. सचिन..’ हा नाद गेली २४ वर्षे जगभरातील क्रिकेट स्टेडियम्सवर निनादला. देशोदेशीचे गोलंदाज, मैदाने यांच्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरने अनेक विश्वविक्रम पादाक्रांत केले. १५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी सचिनने पाकिस्तानी भूमीवर आपले कसोटी पदार्पण केले. हा सुवर्णप्रवास आता अस्ताकडे वाटचाल करीत आहे. गुरुवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला हीच भावनिक किनार आहे. ज्या वानखेडेच्या साक्षीने त्याने सोळाव्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये झोकात पदार्पण साजरे करताना गुजरातविरुद्ध शतक झळकावले त्याच मैदानावर २०११मध्ये सचिनने भारताला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न साकारले होते. मग संपूर्ण भारतीय संघाने हा विश्वचषक सचिनला समर्पित केला होता. तेच वानखेडे स्टेडियम चाळिशीच्या सचिनच्या दोनशेव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचे व्यासपीठ आहे. मुंबईत सचिनोत्सवाचे वातावरण बंगालइतके दिखाऊ नसले, तरी या सामन्याचे मुंबईकरांना मोठे औत्सुक्य आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आपल्या आवडत्या मैदानावर सचिनला फक्त १० धावांची खेळी साकारता आली होती. आईच्या इच्छेखातर आपल्या कारकिर्दीतील ऐतिहासिक कसोटी सामना मुंबईत खेळवण्याची विनंती करणारा सचिन घरच्या क्रिकेटरसिकांसमोर शतक झळकावून आपल्या सोनेरी कारकिर्दीचा सुखद शेवट करण्यासाठी उत्सुक आहे. वानखेडे हे सचिनसाठी नेहमीच अनुकूल ठरत आले आहे. या मैदानावरील दहा कसोटी सामन्यांत त्याने एक शतक आणि सात अर्धशतके साकारली आहेत.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील पहिल्या कसोटीत गोलंदाजांचेच राज्य पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने घरच्या मैदानावर आपले लक्षवेधी पदार्पण साजरे केले, तर वेस्ट इंडिजकडून फिरकी गोलंदाज शेन शिलिंगफोर्डने प्रभावी मारा करीत सहा बळी घेतले. सचिनसहित भारताच्या आघाडीच्या फळीला त्यानेच नियंत्रणात आणले. या पाश्र्वभूमीवर सचिनने सराव सत्रातही फिरकी गोलंदाजीसोबत कसून सराव केला. ‘चीनच्या भिंती’प्रमाणे अभेद्य वाटणारी भारताची फलंदाजीची फळी त्या कसोटीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती; परंतु रोहित शर्मा आणि आर. अश्विन या दोघांनी शतके झळकावून भारताला समाधानकारक धावसंख्या रचून दिली. त्यामुळेच ईडन गार्डन्सवर फक्त तीन दिवसांत भारताला एक डाव आणि ५१ धावांनी कसोटी जिंकता आली. मुंबईच्या पदार्पणवीर रोहितने १७७ धावांची अविस्मरणीय खेळी साकारून भारतीय संघातील सहावे स्थान निश्चित केले आहे; परंतु दुसऱ्या कसोटीत मात्र भारतीय फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळावे लागणार आहे. कारण दुसऱ्या कसोटीसह वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत सचिनला विजयाची भेट देण्याचे मनसुबे भारतीय संघाने आखले आहेत.
२०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्याच संघाविरुद्ध अखेरच्या दिवशी १७ फलंदाज बाद झाल्यामुळे कसोटी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरली होती; परंतु आर. अश्विनला शेवटच्या चेंडूवर एकच धाव काढता आल्यामुळे ती कसोटी अनिर्णीत राहिली होती. त्यानंतर २०१२मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला हव्या असलेल्या पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीने आपले खरेखुरे रंग दाखवले. मुंबईतील तो सामना तिसऱ्याच दिवशी इंग्लंडनेजिंकला होता. त्या साऱ्या स्मृती मागे टाकून आता भारतीय संघाला विजयाचा अध्याय रचायचा आहे.
सचिनोत्सवाप्रमाणेच वेस्ट इंडिजसाठीसुद्धा ही कसोटी खास आहे. त्यांचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज ३९ वर्षीय शिवनारायण चंदरपॉलच्या कसोटी कारकिर्दीतील ही दीडशेवी कसोटी आहे. चंदरपॉल आणि मार्लन सॅम्युअल्स यांच्यावरच विंडीजच्या फलंदाजीची प्रामुख्याने मदार आहे. तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेल अद्याप आपल्या दर्जाला साजेशी खेळी साकारू शकलेला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ या विजयानिशी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी उत्सुक आहे. विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमी मात्र आत्मविश्वासाने या कसोटीला सामोरा जात आहे. या महत्त्वाच्या सामन्यात सचिनला बाद करण्यासाठी काय व्यूहरचना आखली आहे, या प्रश्नाला उत्तर देताना सॅमी म्हणाला की, ‘‘आमच्या गोलंदाजांमध्ये सचिनला बाद करण्यासाठी स्पर्धा असेल.’’
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-३ वाहिनीवर.
धावते समालोचन : आकाशवाणीच्या अस्मिता, संवादिता, एफएम गोल्ड वाहिनीवर
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून.

संघ भारत :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ यष्टिरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा, अजिंक्य रहाणे, उमेश यादव, इशांत शर्मा.
वेस्ट इंडिज :
डॅरेन सॅमी (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, टिनो बेस्ट, शिवनारायण चंदरपॉल, शिल्डन कॉट्रेल, नरसिंग देवनरिन, किर्क एडवर्ड्स, शेनॉन गॅब्रिएल, ख्रिस गेल, वीरासॅमी परमॉल, किरान पॉवेल, दिनेश रामदिन, मार्लन सॅम्युअल्स, शेन शिलिंगफोर्ड, चांडविक वॉल्टन.