संक रॉक ते गेट वे ऑफ इंडिया हा सागरी जलतरण स्पर्धेचा थरार ‘स्विमॅथॉन’च्या रूपात १० फेब्रुवारीला मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. परंतु संयोजक महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना आणि ‘स्क्वेअर ऑफ’ यांना या स्पध्रेचे आर्थिक शिवधनुष्य पेलणे कठीण जात आहे. भक्कम प्रायोजकांची साथ नसल्याने गतवर्षी तुटपुंज्या रकमांची बक्षिसे वितरित करणाऱ्या आयोजकांनी यंदा मात्र रोख रकमेऐवजी अन्य स्वरूपातील बक्षिसांना प्राधान्य दिले आहे.
पन्नासपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास असलेली संक रॉक ते गेट वे ही सागरी जलतरण स्पर्धा २००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे खंडित झाली होती. सुरक्षाविषयक सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर गेल्या वर्षी ही स्पर्धा ‘स्विमॅथॉन’ या नव्या स्वरूपात पुनरुज्जीवित झाली आणि या स्पध्रेला प्रतिसादही उत्तम लाभला होता. २६/११च्या मुंबई हल्ल्याप्रसंगी समुद्रमार्गाने अतिरेक्यांनी या महानगरात शिरकाव केला होता. या पाश्र्वभूमीवर सागरी जलतरण स्पर्धेच्या सुरक्षा व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. यंदा या स्पर्धेसाठी २३ ट्रॉलर्स, कोस्ट गार्डच्या २ स्पीड बोट, ८ मोटार लाँचेस, राज्य जलतरण संघटनेच्या दोन स्पीड बोटी आणि पायलट बोटी असा ताफा सज्ज असणार आहे.
‘‘डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे या प्रत्येक गोष्टीसाठी अतिरिक्त पैसा खर्च होणार आहे. या वर्षी काही प्रायोजकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र तरीही हे गणित जुळवणे ही तारेवरची कसरत आहे. जलतरण प्रशिक्षक, पदाधिकारी, लाइफगार्ड्स असा दीडशे जणांचा चमू स्पर्धा सुरळीत व्हावी यासाठी काम पाहणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचा ८ जणांचा संघही उपस्थित राहणार आहे,’’ असे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे सचिव किशोर वैद्य यांनी सांगितले.
‘‘गेल्या वर्षी प्रत्येक गटातील विजेत्यांना समाधानकारक बक्षीस रक्कम देण्यात आम्ही अपयशी ठरलो होतो. या वर्षी एकूण १० लाख रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्यांना तुटपुंजी रोख रक्कम देण्याऐवजी अन्य स्वरूपात बक्षीस दिले जाणार आहे. गटातील अव्वल विजेत्याला दोन जणांसह आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे पॅकेज मिळेल,’’ अशी माहिती ‘स्क्वेअर ऑफ’चे प्रवक्ते अनिल अगरवाल यांनी सांगितले.

रविवार, १० फेब्रुवारीला भरतीच्या वेळेनुसार स्विमॅथॉन होणार आहे. यंदा १० ते १२ या वयोगटासाठी सबज्युनिअर गट तयार करण्यात आला आहे. युवा खेळाडूंना सागरी स्पर्धेचा अनुभव मिळावा आणि २०२० ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. अपंग आणि सर्वसाधारण विभाग मिळून १४ विविध गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. यंदा एकूण ६०० जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.