करोनामुळे ऑस्ट्रेलियातील क्रिकेट ठप्प असले तरी ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रि के ट प्रकारांचा कर्णधार आरोन फिंचने यादरम्यानही ऑनलाइन प्रशिक्षणाचे कार्य सुरू ठेवले आहे. दुसऱ्या इयत्तेतील एका क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांला फिंचने खेळाशी निगडित प्रकल्प बनवण्यासाठी मार्गदर्शनही केले.

टाळेबंदीच्या काळात मेलबर्नच्या ब्लॅकबर्न लेक प्राथमिक शाळेने ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात केली. यादरम्यान विद्यार्थ्यांना आवडत्या विषयावर शालेय प्रकल्प करण्याचे सांगण्यात आले. परंतु अ‍ॅलेक्स अल्टय़ूबला ऑनलाइन शिक्षणात रस नसल्याने या शाळेतील शिक्षिका कॅथरिन टेलर यांच्या विनंतीनुसार फिंचने अ‍ॅलेक्सला क्रिकेटच्या नियमांवर आधारित एखादे चित्र काढण्याचे सांगितले. क्रिकेट चाहता असणाऱ्या अ‍ॅलेक्सने फिंचच्या सांगण्यानुसार क्रिकेटच्या मैदानाचे छायाचित्र काढून त्यामध्ये क्षेत्ररक्षणाच्या विविध दिशाही नमूद केल्या.

‘‘अ‍ॅलेक्सचे क्रिकेटविषयीचे ज्ञान वाखाणण्याजोगे आहे. मी त्याच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून क्रिकेटच्या अनेक बारीकसारीक गोष्टी त्याला सोप्या भाषेत समजावल्या. यापुढे तो नक्कीच ऑनलाइन शिक्षणाचाही आनंद लुटेल, अशी आशा आहे,’’ असे फिंच म्हणाला.