कोपनहेगन : डेन्मार्कचा ख्रिस्तियन एरिक्सन मैदानावरच कोसळल्यामुळे युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील फिनलंडविरुद्धच्या सामन्याला दु:खाची किनार लाभली. जोएल पोजानपालो याने केलेला गोल आणि लुकास राडेक्सी याने वाचवलेली पेनल्टी यामुळे फिनलंडने डेन्मार्कवर १-० असा विजय मिळवला.

पहिल्या सत्राच्या अखेरीस एरिक्सन मैदानावरच कोसळल्यामुळे तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी खेळ ९० मिनिटे थांबवण्यात आला. पुन्हा खेळाला सुरुवात झाल्यानंतर जेरे युरोनेन याच्या क्रॉसवर पोजानपालो याने गोलरक्षक कास्पेर स्मेइशेल याला चकवून फिनलंडला आघाडीवर आणले. डेन्मार्कने या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले, तर फिनलंडचा गोल करण्याचा हा एकमेव प्रयत्न ठरला. ७४व्या मिनिटाला डेन्मार्कला पेनल्टीवर गोल करण्याची उत्तम संधी होती. पण पाएरे-एमिले होजबर्ग याने मारलेला फटका राडेक्सीने अडवला.

बेल्जियमच्या विजयात लुकाकूची चमक

सेंट पीटर्सबर्ग : बेल्जियमने रशियाचा ३-० असा सहज पाडाव करत युरो चषकात शानदार सुरुवात केली. रोमेलू लुकाकूने दोन गोलचे योगदान दिले. लुकाकूने १०व्या मिनिटालाच खाते उघडत पहिला गोल इंटर मिलानचा सहकारी ख्रिस्तियन एरिक्सनला समर्पित केला. तत्पूर्वी, खेळाला सुरुवात होण्याआधी बेल्जियमच्या खेळाडूंनी गुडघ्यावर बसून वर्णद्वेषी लढय़ाविरोधात आपला पाठिंबा दर्शवला. ३४व्या मिनिटाला बदली खेळाडू थॉमस म्यूनिएरने दुसरा गोल करून बेल्जियमला २-० अशा आघाडीवर आणले. त्यानंतर ८८व्या मिनिटाला लुकाकूने तिसरा गोल करत बेल्जियमचा विजय निश्चित केला.

इंग्लंडची क्रोएशियावर सरशी

बलाढय़ इंग्लंडने रविवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियावर १-० अशी सरशी साधली. रहिम स्टर्लिगने ५७व्या मिनिटाला केलेला गोल इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. क्रोएशियाने २०१८च्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केले होते. क्रोएशियाला प्रथमच युरो चषकातील सलामीचा सामना गमवावा लागला.