तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा क्रिकेट संघ विदेशात मालिका खेळण्यासाठी बाहेर पडला आहे. अफगाणिस्तानचा अंडर १९ क्रिकेट संघ रविवारी बांगलादेशमध्ये दाखल झाला आहे. तालिबानने सत्ता हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच क्रिकेट संघ मालिका खेळणार आहे.

अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशच्या अंडर १९ टीमसोबत खेळणार आहे. यावेळी पाच एकदिवसीय सामने आणि एक चार दिवसांचा सामना खेळवला जाणार आहे. सिल्हेट इंटरनॅशनल स्टेडियममध्ये १० ते २५ सप्टेंबरदरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते रबीद इमाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आठ खेळाडूंचा पहिला ग्रुप ढाकामध्ये पोहोचला आहे. इतर खेळाडू दोन ग्रुपमध्ये दाखल होणार आहेत”. तालिबानने ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा हा पहिलाच संघ असणार आहे.

ढाकामध्ये पोहोचताच खेळाडू सिल्हेटसाठी रवाना झाले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाल टी-शर्टमध्ये दिसणाऱ्या अफगाणिस्तानी क्रिकेटपटूंचा व्हिडीओ शेअर केला आहे.