पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही फिट इंडिया संवाद या चर्चासत्राअंतर्गत आरोग्य आणि खेळाडूंच्या स्वास्थासंदर्भात चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी एखाद्या सर्व सामान्य क्रिकेट चाहत्याप्रमाणे विराटला यो यो टेस्ट म्हणजे काय हा प्रश्न विचारला. पंतप्रधानांचा प्रश्न ऐकून विराटलाही हसू आलं. मात्र त्याने मोदींच्या प्रश्ननाला यो यो टेस्ट म्हणजे काय आणि ती कशासाठी आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली.

“मी ऐकलंय की सध्या संघामधील प्रत्येकाची यो यो टेस्ट घेतली जाते. कर्णधारालाही यो यो टेस्ट करावी लागते की कर्णधाराला यामधून सूट दिली जाते. मूळात यो यो टेस्ट असतं काय आणि त्यामध्ये काय काय करावं लागतं,” असं प्रश्न पंतप्रधान मोदींनी विराटला विचारला. कर्णधाराला सूट मिळते का या प्रश्नावर विराटला हसू आलं. या प्रश्नांना उत्तर देताना विराटने, “खेळांडूंची फिटनेस तपासून पाहण्यासाठी ही टेस्ट आवश्यक असते. तर आपण जागतिक स्तरावरील संघांशी तुलना केली तर आपल्या खेळाडूंची फिटनेस इतर देशातील खेळाडूंपेक्षा अजूनही कमी दर्जाची आहे. हाच दर्जा वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. खेळासाठी हे खूप महत्वाचं आहे. एकदिवसीय सामना किंवा टी-२० सामना एका दिवसात संपतो. मात्र कसोटी सामन्यांमध्ये तुम्हाला पाच दिवस खेळावं लागतं. रोज संध्याकाळी परत जायचं आणि दुसऱ्या दिवशी उत्साहाने मैदानात उतरायचं हे अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी फिटनेसचा दर्जा कायम ठेवणं गरजेचं आहे,” असं सांगितलं.

पुढे बोलताना विराटने सर्वात आधी मीच सरावाला सुरुवात करतो असंही सांगितलं. “सर्वात आधी मीच मैदानात जाऊन धावायला सुरुवात करतो. मी सुद्धा या टेस्टमध्ये अपयशी ठरलो तर माझाही अंतिम संघामध्ये विचार केला जाणार नाही. मला वाटतं अशाप्रकारची एक पद्धत तयार करणे आणि ती अंमलात आणणे संघासाठी अंत्यत महत्वाचे असते. यामुळे संपूर्ण संघाची क्षमता वाढते. कसोटीमध्ये अनेकदा असं होतं की काही दिवसांचा खेळ झाल्यानंतर खेळांडूंना थकवा जणवतो. आपले जलदगती गोलंदाज जे जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांना जर कसोटीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी चमकदार कामगिरी करण्याची गरज असेल तर फिटनेसच्या जोरावर ते हे करु शकतात. आपल्याकडील गोलंदाजांमध्ये कैशल्य आहे. मात्र आधी काय व्हायचं की जेव्हा संघाला तुमची गरज असायची तेव्हाच शरीर खेळाडूंना साथ द्यायचं नाही आणि तिथेच आपल्या संघाची कामगिरी ढासाळायची आणि दुसरी संघ विजयी व्हायचा. आज आपण या गोष्टींचे नीट व्यवस्थापन करतो आणि गरजेप्रमाणे लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आपल्या संघाकडून चांगले निकाल मिळत आहेत. खेळांमध्ये एक दर्जा काम ठेवणे आवश्यक आहे,” असं विराटने मोदींना दिलेल्या उत्तरात सांगितलं.

“विराट मी तुला अनेकदा बघतो. तू मैदानात कायमच चपळ हालचाली करत असतो. तू खूप अॅक्टीव्ह असतोस. तर तुला कधी थकवा जाणवत नाही का?”, असा पुढचा प्रश्न मोदींनी विराटला विचारला. “खरं सांगायचं तर थकवा सर्वांना येतो. शारीरिक कष्ट घेतल्यानंतर सर्वचजण थकतात. मात्र तुम्ही तुमची लाईफस्टाइल योग्य पद्धतीने ठेवत असाल, चांगलं अन्न खात असाल, फिटनेससंदर्भात काळजी घेत असाल, वेळेत झोपण्याची सवय असेल, पुरेशी झोप घेत असाल तर तुमचा रिकव्हरी रेट चांगला असेल. थोडक्यात सांगायचं तर मी थकत असेल आणि एका मिनिटामध्ये मी पुन्हा खेळण्यासाठी तयार होत असेल तर तो माझ्या प्लस पॉइण्ट आहे. एकंदरितच तुम्ही कसं राहता यावर तुम्ही किती थकता हे अवलंबून असतं,” असं विराट म्हणाला.