ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या सराव सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने दमदार कामगिरी केली. गुलाबी चेंडू वापरण्यात आलेल्या या तीन दिवसीय सराव सामन्यात पंतने शतक ठोकले. या सामन्यात जॅक वाइल्डरमुथच्या एकाच षटकातने त्याने २२ धावा चोपून काढल्या. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावरील या सामन्यात रविवारी ऋषभ पंत दिवसातील शेवटच्या षटकात जॅक वाइल्डरमुथच्या गोलंदाजीचा सामना करत होता. त्यावेळी तो ८१ धावांवर खेळत होता.

पंतने त्या नाटयमय षटकात नेमकं काय घडलं? त्याच्या आठवणी सांगितल्या. त्या षटकात शतक होईल, असे ऋषभला सुद्धा वाटले नव्हते. पण त्यावेळी मैदानावरील सहकारी हनुमा विहारीच्या मदतीमुळे हे शक्य झाले. षटकातील जॅक वाइल्डरमुथने टाकलेला पहिलाच चेंडू ऋषभच्या पोटात लागला. त्यानंतर त्याने चार चौकार आणि एक षटकार खेचले.पंतने त्याचे शतक पूर्ण करताना नाबाद १०३ धावा केल्या. रविवारी भारताने चार बाद ३८६ धावांवर डाव घोषित केला. पंतने अवघ्या ७३ चेंडूत शतक झळकवले. विहारीने संयमी फलंदाजी करत १९४ चेंडूत शतक झळकावले.

“डाव सुरु असताना मी शतकाच्या जवळ पोहोचलो होतो. दिवसातील शेवटचे षटक सुरु होते. मला शतकासाठी २१ धावांची आवश्यकता होती. सुरुवातीला मला आज शतक होणार नाही असे वाटले. पहिला बॉल माझ्या पोटात लागला. त्यामुळे मी संतापलो” असे पंतने बीसीसीआय टीव्हीला सांगितले.

“मी एखाद-दुसरे मोठे फटके खेळले पाहिजे, असं मला वाटलं. विहारी माझ्याजवळ आला व त्याने सांगितले की, तू आज शतक करु शकतोस. तुला प्रयत्न केला पाहिजे. जर हे आज नाही घडलं तर उद्या सकाळी तू शतक झळकवू शकतोस. मी विचार केला, प्रयत्न केला पाहिजे. जर असं झालं तर चांगलच आहे” असे ऋषभ म्हणाला. त्यानंतर मला सूर सापडला आणि मी शतक झळकावले असे ऋषभने सांगितले. सराव सामन्यातील या शतकामुळे माझा आत्मविश्वास दुणावल्याचे तो म्हणाला.